ही श्रींची इच्छा!

0

डॉ.युवराज परदेशी:

आज दिवाळी पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यात आली आहेत. समाजात आजपर्यंत अनेक संकटे आली आणि गेली. कधी ती मानवनिर्मित होती तर कधी ती निसर्गनिर्मित होती. परंतु, कोणत्याही संकटांमुळे मंदिरे बंद झाल्याचे ऐकिवात नाही. परंतु कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावामुळे ‘देऊळ बंद’ करण्याची वेळी आली होती. मात्र, या काळात डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढर्‍या कपड्यांत तर पोलिसांच्या रुपात खाकी कपड्यात भक्तांची काळजी वाहत होता. आता कोरोनाचे संकट कमी होत असल्याचे राज्यासह देशात अनलॉकचे पर्व सुरु झाले आहे. हळूहळू सर्व कार्यालये, आस्थापनांसह एसटी, थिएटर, आदी सुरु झाल्यानंतरही मंदिरे बंद होती. यावर राजकारण देखील झाले. आता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सर्व प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे मंदिरांमध्ये गर्दी करुन पुन्हा देवाला बंदी बनविण्याचे पातक कुणी करु नये, याची प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

गेल्या आठ महिन्यांपासून संपूर्ण जगभरात कोरोनाची साथ सुरू आहे. मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रात पहिला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर संपूर्ण देशांत लॉकडाऊन करण्यात आला. तेंव्हापासून सर्व मंदीरे, मशिद, चर्च, गुरुव्दारा आदी प्रार्थनास्थळे बंद होती. या प्रार्थनास्थळांमध्ये गर्दी होवून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असता म्हणून हा निर्णय घेण्यात आला, जो तत्कालीन परिस्थितीनुसार योग्य देखील होता. कारण धर्माच्या नावाखाली एकत्र आल्यामुळे कोरोनाचा प्रसार कसा झाला हे आपण दिल्लीत मरकजच्या रुपाने अनुभव घेतला आहे. गत आठ महिन्यांपासून सर्वच प्रार्थनास्थळे बंद असल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेले अर्थकारणदेखील बिघडले होते. कारण, देव जरी मंदिरात एकाच जागी बसत असला तरी तो तेथे बसूनच अनेकांचे पोट भरण्याची सोय लावत असतो.

मंदिरांबाहेर फुल, हार, नारळ, पुजा साहित्य, खेळणी विक्रेत्यांच्या पोटापाणीची व्यवस्था यावरच अवलंबून असते मात्र आठ महिन्यांपासून मंदीरे बंद त्यामुळे जत्रा, उत्सवांवर देखील मर्यादा आल्याने विक्रेत्यांना मोठा फटका बसला, त्यांचे अर्थकारणच बिघडले. यानंतर अनलॉकमध्ये सर्व व्यवहार सुरू होत असताना श्रद्धास्थाने कुलूपबंद का? असा प्रश्न उपस्थित होत होता, सरकार केव्हा पावणार? याची या विक्रेत्यांना आस लागली होती. दुसरीकडे या विषयावरुन भाजपाने आक्रमक भूमिका घेत मंदिरांबाहेर घंटानाद आंदोलन करत शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्र्रयत्न केला. यातील राजकारणाचा भाग सोडला तर मंदिरे उघडण्याची आस सर्वच भक्तांना लागली होती. परंतु, सरकारच्या नजरेने पाहिल्यास मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळून कोरोनाला आमंत्रण मिळणार नाही ना? या विवंचनेत सरकार असावी, त्यांची काळजी योग्य असली तरी सध्या दिवाळीच्या निमित्ताने बाजारात अभूतपूर्व अशी गर्दी उसळली आहे जणू याच गर्दीत कोरोनाला चिरडून मारण्याचा प्लान तर आखलेला नाही ना? अशी शंका येते. बाजारात झालेल्या गर्दीमुळे अर्थव्यवस्थेला हातभार लागून मंदीत रुतलेले अर्थचक्र गतीमान होण्यास मदत होईल, ही एक सकारात्मक बाब असली तरी कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही, याचे भान ठेवण्याची आवश्यकता आहे.

कोरोनाबाबतची नागरिकांची बेफिकिरी जनतेला भविष्यात भारी पडू शकते, असा इशारा सरकार आणि तज्ञांकडून वारंवार दिला जात आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याने फ्रान्स, जर्मनीसह अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. तशी वेळ भारतात येवू नये यासाठी सर्वांनीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे स्वतःची खबरदारी हीच जबाबदारी हे मनात ठेवत पुढील काही दिवस नियमांचे पालन केले तर अन् तरच कोरोनाला हरवणे शक्य असेल. आता मंदिरांचे दरवाजे उघडले गेले आहेत. आता जर कोणत्याही प्रार्थनास्थळांमुळे कोरोनाचा उद्रेक झाला तर त्याला तुम्ही आणि आम्ही जबाबदार असू. राज्य सरकारने सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला असला तरी नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल.

मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळून व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करायला हवे. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेले खूप मार्मिक भाष्य केले आहे. ते म्हणाले की, हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील, असे भावनिक आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे. कोरोना नियंत्रणात येत असला तरी संकट टळलेले नसून बेसावध राहणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण देणेच होईल. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारी पातळीवर योग्य ते प्रयत्न आजही सुरु आहेत. मात्र कोरोनाला खरंच हरवायचे असेल तर सरकारी यंत्रणेला सगळ्यांची साथ मिळणे गरजेचे आहे.

कोरोनावर लस नसल्यामुळे कोरोनाला हरवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसह तोंडावर मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे, गर्दी टाळणे या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मंदिरांमध्ये किंवा अन्य कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळांमध्ये गर्दी उसळून कोरोनाचा प्रसार झाला तर कोरोनाच्या संकटकाळात देवरुपाने दिसलेल्या डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्यावरील ताण पुन्हा वाढेल. आपला जीव गमावून अनेकांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल. जर असे होवू द्यायचे नसेल तर प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे. अन्यथा या चुकांबद्दल देवदेखील माफ करणार नाही, याचे भान प्रत्येकाने ठेवण्याची आवश्यकता आहे.