शहादा । बहुजन समाजावर फॅसिझम पद्धतीने सध्या हुकुमशाही लादली जात असल्याची स्थिती आहे. या विरोधात मतभिन्नता विसरून संघटितपणे सर्वांनी लढण्याची गरज आहे. सर्वांना एकत्रित करण्याच्या उद्देशाने विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलन असल्याचे मत विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा नजुबाई गावित यांनी व्यक्त केले. शहादा जि. नंदूरबार येथे 23 व 24 डिसेंबरला 13 वे विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात कॉ.नजुबाई गावित यांनी सांगितले.
आवाज उठविण्याची गरज
पुढे त्या म्हणाल्या की, अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ जोमाने पुढे चालली पाहिजे. त्यासाठी चळवळीला सर्वांनी बळ द्यावे. सातपुडा पर्वतरांगांच्या परिसरात यावर्षीचे संमेलन होत आहे. येथील आदिवासी समाजाची कला, संस्कृती पाहण्यासाठी डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते, लेखक आणि साहित्यिकांनी या संमेलनात सहभागी होण्याची गरज आहे. अदिवासी समाजाने कला जोपासल्या आहेत. सर्वच कलांमध्ये बेगडीपणा येत आहे. चित्रपटांप्रमाणे संस्कृती पुढे येत आहे. पारंपरिक कला, संस्कृतीला पुढे आणण्यासाठी विद्रोही साहित्य संमेलन होत आहे. चळवळीच्या माध्यमातून लढताना साहित्याचे महत्त्व समजू लागले, असे त्यांनी सांगितले.