पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील सत्ताधारी भाजप सभागृह लोकशाही पद्धतीने चालवत नाहीत. हुकूमशाही पद्धतीने सभागृह चालविले जात आहे. भाजपच्या या हुकूमशाही, दडपशाहीचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक लढविल्याचे, विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी सांगितले. तसेच पालिका प्रशासन भाजपच्या तालावर नाचत आहे. एखादी माहिती मागविल्यास प्रशासनाकडून ती देण्यास टाळाटाळ केली जाते, असा आरोप देखील त्यांनी प्रशासनावर केला आहे.
सभागृहातील दादागिरी नेहमीचीच
स्थायी समिती अध्यक्षपदाची बुधवारी निवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोरेश्वर भोंडवे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे स्थायीत चार सदस्य असताना देखील राष्ट्रवादीने उमेदवार उभा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी प्रसिद्धीपत्रक काढून पक्षाची भूमिका सांगितली आहे. भाजपच्या सभागृहातील हुकूमशाहीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने ही स्थायीची निवडणूक लढविल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सभागृहात लोकशाही नाही
भाजप बहुमताच्या जोरावर सभागृह लोकशाही पद्धतीने चालवत नाही. हुकूमशाही पद्धतीने सभागृह चालविले जात आहे. विरोधकांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही. सभागृह हे सभाशास्त्राच्या नियमानुसार न चालवता सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार केला जात आहे. सभागृहात विरोधकांचा विरोध नोंदविला जात नाही. एखाद्या विषयावर सभागृहात मतदानाची मागणी केल्यास मतदान घेतले जात नाही. उपसूचनांचा भडीमार केला जातो. पूर्ण उपसूचना वाचल्या जात नाहीत, असे बहल म्हणाले.
पाणीपट्टीवाढीला भाजपच जबाबदार
पाणीदरवाढीला सर्वस्वी भाजप जबाबदार आहे. त्या सभेतील गोंधळाला सत्ताधारी भाजप जबाबदार आहे. या विषयाला आमच्यासह सर्वंच विरोधकांनी विरोध दर्शविला होता. विरोधकांचा विरोध न नोंदविता गोंधळामध्ये या विषयाची उपसूचना न स्वीकारता पाणीपुरवठ्याचा विषय मंजूर केला. या विषयाला वाचली गेलेली उपसूचना हेतूपरस्पर अर्धवट वाचली गेली. यामध्ये किमान पाणीपट्टी बिलाचा मुद्दा वाचला गेलाच नाही. अशाप्रकारे सभाशास्त्राचे नियम पायदळी तुडविले गेले आणि प्रशासन सुद्धा याची पाठराखण करत करते. हे मोठे दुर्देव आहे. प्रशासन भाजपच्या तालावर नाचत असून त्यांच्याकडे एखाद्या विषया संदर्भात माहिती मागविली असता त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते, असा आरोप बहल यांनी केला आहे.