पुणे । सध्या झपाट्याने बदलणार्या जीवनशैलीमुळे व्यसनाधिनतेकडे वळणार्या तरुणाईची संख्या वाढत आहे. त्यामध्ये एक व्यसन म्हणजे हुक्का ओढणे. हुक्का पार्लरमध्ये जाणे ही सध्या प्रतिष्ठेची बाब मानली जात असून तरुणाईमध्ये याची क्रेझ जास्त वाढत आहे. त्याचबरोबर हुक्क्याचे व्यसन केल्याने एक वेगळाच आनंद मिळतो, ताण-तणाव कमी होतो, असा गैरसमज वाढत असतानाच हुक्का पार्लर बंदीसाठी प्रशासन व सामाजिक संस्था कार्यरत आहेत. परंतु त्याबरोबर तरुणांची देखील साथ मिळाली तर या व्यसनाला नक्कीच आळा बसेल, असा सूर हुक्कापार्लर हे एक वाईट व्यसन या विषयावरील चर्चासत्रात उमटला.
‘हुक्कापार्लर बंदी’
राष्ट्रीय युवा दिन व स्वामी विवेकानंद जयंती दिनानिमित्त आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रातर्फे मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स येथे ‘हुक्कापार्लर बंदी’ या विषायवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड, डॉ. अमोद बोरकर, प्रा. अविनाश ताकवले, डॉ. अजय दुधाणे, राजन चांदेकर, प्राचार्य एम.डी लॉरेन्स, प्रा. सारंग एडके, प्रा. सुशील गंगणे आदी उपस्थित होते.
हुक्क्याची एक ठिणगी जीवघेणी
आव्हाड म्हणाले, हुक्क्याची एक ठिणगी किती जीवघेणी ठरू शकते हे कमला मिल येथे घडलेल्या दुर्घटनेत समजते. कोणत्याही राष्ट्राची हानी ही त्या देशातील तरुणांच्या व्यसनाधीनतेमुळे होते. आपले जीवन आणि राष्ट्र आपल्याला प्रगत करायचे असेल तर व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. आपल्या राष्ट्राची हानी टाळायची असेल तर व्यसनांच्या विळख्यात अडकू नका, असे त्यांनी सांगितले. डॉ.अमोद बोरकर, प्रा.अविनाश ताकवले यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. अजय दुधाणे यांनी प्रास्ताविक केले. राजन चांदेकर यांनी सूत्रसंचालन केले.
आयटी पार्कमुळे नाइट लाइफ संस्कृती
डॉ. धेंडे म्हणाले, शहरात वाढणार्या आयटी पार्कमुळे नाईट लाईफची संस्कृती जोमाने वाढत आहे. पुण्यात फक्त हुक्का पार्लरला बंदी होऊन चालणार नाही, तर पुढील कारवाई महत्त्वाची आहे. या व्यसनातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे.