उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन : सुनील महाजन यांची माहिती
जळगाव: राज्य शासनाने मनपावरील हुडकोचे कर्ज कमी करून, 250 कोटींची एकरक्कमी हुडकोला देवून मनपाला काही प्रमाणात दिलासा होता. मात्र, 250 कोटीतील निम्मे रक्कम म्हणजे 125 कोटी रुपये मनपाकडून महिन्याला 3 कोटी प्रमाणे दिली जात आहे. मनपाकडून आतापर्यंत 45 कोटींची रक्कम भरण्यात आली असून, उर्वरित 80 कोटींची रक्कमही आता राज्य शासन कमी करण्याचा तयारीत असून, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याची माहिती मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी दिली.
मुंबईला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुनील महाजन व अभिषेक पाटील यांनी गुरुवारी भेट घेतली. यावेळी मनपावरील कर्जाच्या मुद्द्यासह राज्य शासनाने स्थगिती दिलेल्या 100 कोटी रुपयांच्या निधीबाबत देखील चर्चा झाली असल्याची माहिती सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत बुधवारी बैठक घेतली जाणार असून, नगरविकास विभागातील सचिवांशी देखील उपमुख्यमंत्र्यांनी भेट घेतली असल्याचे महाजन यांनी सांगितले.
100 कोटींवरील स्थगिती उठविण्याची मागणी
उपमुख्यमंत्र्यांकडे तत्कालीन राज्य शासनाने मनपाला जाहीर केलेल्या 100 कोटींच्या निधीवर लावण्यात आलेली स्थगिती उठविण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. मात्र, ही स्थगिती उठविण्यासाठी नवीन कामांचा नव्याने प्रस्ताव सादर करण्याचा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याची माहिती महाजन यांनी दिली. तसेच मनपाची सर्व अधिकारी भाजपचेच गडी असल्याने हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्याची मागणी देखील उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याची माहिती महाजन यांनी दिली.
शिवाजीनगर भागात स्वतंत्र पोलीस स्टेशन द्यावे
शिवाजीनगर भागात काही महिन्यांपासून गुन्हेगारी वाढली असून, या भागातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी या भागात स्वतंत्र पोलीस स्टेशन तयार करण्यात यावे यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती अभिषेक पाटील यांनी दिली.