जळगाव- पिंप्राळा हुडकोतील रझा कॉलनीमधील 11 वर्षीय बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिच्या आई, वडिलांना पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही मुलगी अपशकुनी असल्याचा समज तिच्या वडिलांचा झाला होता. या तिरस्कारातून त्या बालिकेकडे दुर्लक्ष झाले. जेवण न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय प्राथमिक अहवाल प्राप्त झालाआहे.
कनीज फातेमा जावीद अख्तर शेख या बालिकेचा 23 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास संशयास्पद मृत्यू झाला. बालिकेचा मृतदेह तिचे वडील जावेद शेख यांनी 24 रोजी मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थित दफन केला. नंतर शेख दाम्पत्य मोठ्या मुलीसह अचानक गायब झाले. या घटनेबाबत शेजारील एका महिलेने तिचे मामा व आजोबाला कळविले. त्यांना बालिकेचा मृत्यू संशयास्पद वाटला. याबाबत बालिकेचा मामा अजहरअली शौकतअली यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यासंदर्भात पोलिसांनी शेख दाम्पत्याला अमळनेरातून चौकशीकामी ताब्यात घेतले होते.
पोलिसांनी तहसीलदारांच्या परवानगीने बालिकेचा मृतदेह उकरुन शवविच्छेदन केले. तिचा मृत्यू भुकेमुळे झाल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बालिकेचे वडील जावेद शेख व आई नाजीया शेख यांना बुधवारी अटक केली. त्यांच्या विरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर करीत आहेत.