जळगाव । महानगरपालिकेवरील हुडकोच्या कोट्यवधींच्या कर्ज डोंगर कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हुडकोच्या कोट्यवधींचे कर्जांबाबत मुख्यमंत्र्यांनीही केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र देऊन साकडे घातले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कर्जफेडीचा तिढा सोडविण्यासाठी संबंधित विभागांची 29 जूनला संयुक्त बैठक होत आहे. हुडकोच्या अधिकार्यांना मनपाच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यासंदर्भात योग्य सूचना करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी नायडूंना पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री. नायडूंना दिलेल्या पत्रात या कर्ज प्रकरणाचा संपूर्ण तपशील देण्यात आला आहे. तत्कालीन पालिकेने हुडको’कडून विविध योजनांसाठी 141 कोटी 38 लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र, या कर्जाची परतफेड शक्य न झाल्याने 2004 मध्ये कर्जाच्या रकमेची पुनर्रचना करण्यात आली. मात्र, त्यानंतरही कर्जफेडीत अडचणी आल्यानंतर हुडकोने मनपाविरुद्ध डीआरटीत अर्ज केला. डीआरटीने मनपाला 340 कोटी 74 लाखांची डिकरी’ नोटीस बजावली. मनपाने या नोटिशीला डीआरएटीसह उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.