जळगाव। शिवाजीनगर हुडको परिसरात मंगळवारी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचारी गस्त घालत असताना चोरी करताना दोन अल्पवयीन मुलांना चोरी करणताना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीतील ऐवज हस्तगत केला आहे. सोमवारी रात्री 12 ते मंगळवारी पहाटे 4 वाजेच्या दरम्यान शिवाजीनगर हुडको परिसरात शेख फारूख शेख हसन यांच्या किराणा दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील 3 हजार 900 रुपये आणि एक मोबाइल चोरून दोन अल्पवयीन चोरटे पळण्याच्या तयारीत होते. त्यावेळी शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी इम्रान सय्यद शिवाजीनगर हुडको भागात गस्त घालत होते. त्यांनी दोघांना हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 3 हजार 900 रुपये आणि एक मोबाइल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
आणखी दोन ठिकाणी चोरी
शिवाजीनगर हुडको परिसरात आणखी दोन ठिकाणी चोरी झाल्याचे समोर आले आहे. त्यात सुनील नामदेव चौधरी यांच्या मालकीच्या किराणा दुकानातून 1 हजार 500 रुपये आणि भरत पुंडलीक कोचरे यांच्या उघड्या घरातून 2 हजार रुपये चोरट्यांनी लांबविले आहेत. मात्र त्या दोन्ही चोर्या ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन चोरट्यांनी केली नसल्याची कबुली त्यांनी पोलिसांच्या चौकशीत दिली आहे. दरम्यान, दोघांना मंगळवारी सायंकाळी बाल न्यायमंडळात हजर करण्यात आले होते.
बाल सुधारगृहात रवानगी
सोमवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास तीन जण संशयीतरित्या या भागात फिरत असल्याची माहिती या परिसरातील नागरीकांनी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही चोर्या त्यांनी केल्या असल्याचा पोलिसांना संशय आहे. दोन्ही अल्पवयीन चोरट्यांना मंगळवारी बाल न्यायालयात हजर केलेे असता त्यांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन अल्पवयीन चोरट्यांपैकी एकावर काही दिवसांपुर्वी शिवाजीनगरातून सायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे. तर भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्यात दोन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.