डीआरयुसीसी सदस्य अनिकेत पाटील यांच्या मागणीची दखल ; भुसावळात रेल्वे सल्लागार समितीची बैठक ; विभागातील सदस्यांनीही मांडल्या समस्या
भुसावळ- भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसला तीन स्लीपर डबे जोडण्याबाबत रेल्वे प्रशासनाने सकारात्मकता दर्शवत रेल्वे स्थानकांवरील स्टोअर्समध्ये तातडीच्या औषधोपचारासाठी लागणार्या औषधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत भुसावळ विभागातील रेल्वे स्थानकावर प्रवाशांना पुरवण्यात येणार्या सोयी-सुविधांबाबत माहिती दिली. रेल्वे विभागाच्या मंडळ रेल उपयोगकर्ता सल्लागार समिती सदस्याची 162 वी बैठक बुधवारी दुपारी डीआरएम कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत भुसावळातील डीआरयुसीसीचे सदस्य अनिकेत पाटील यांनी हुतात्मा एक्सप्रेसला तीन स्लिपर कोच बसविण्याबाबतची महत्वाची सूचना मांडली. यावर लवकरच उपाययोजना होणार असल्याने शहरासह विभागातून कल्याण व पुणे येथे जाणार्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय मिळणार्या औषधी मिळणार
बैठकी भाजयुमोचे शहराध्यक्ष तथा रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अनिकेत पाटील भुसावळ स्थानकावरून रात्री सुटणार्या भुसावळ-पुणे (हुतात्मा) एक्सप्रेसला तीन स्लिपर कोच लावण्यासह स्थानकावर जेनरीक मेडीकल सुरू करण्याची मागणी केली होती. या दोन्ही मागण्यांबाबत रेल्वे प्रशासनाने सकारात्मता दर्शवत रेल्वे बोर्डाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगितले तर डॉक्टरांच्या प्रिस्प्रीक्शन शिवाय मिळणारी औषध स्थानकावर मिळणार आहेत. हुतात्मा एक्सप्रेसलाही लवकरच तीन स्लिपर कोच लावण्यात येणार असल्याने कल्याण व पुणे येथे जाणार्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
विभागातील सदस्यांनीही मांडले प्रश्न
मलकापूरचे मोहन शर्मा यांनी अमरावती-सुरत एक्स्प्रेस दैनंदीन सुरू करण्याची मागणी करीत बडनेरा रेल्वे स्थानकावर महिला तिकीट निरीक्षकाच्या नियुक्तीची मागणी केली मात्र दररोज गाडी चालवणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण रेल्वेने देत आवश्यकता वाटल्यास तिकीट निरीक्षकांचा स्टॉफ तेथे वाढवण्यात येईल, असे सांगितले. भुसावळचे राजेश झंवर यांनी मनमाड येथून सुटणार अप राज्यरानी एक्स्प्रेस भुसावळातून सुरू करण्याची मागणी करीत तसे केल्यास प्रवाशांची सोय होणार असल्याचे सांगितले तसेच अजंता एक्स्प्रेस भुसावळहून सुरू केल्यास हैद्राबादकडे जाणार्या प्रवाशांची सोय होणार असल्याचा प्रस्ताव दिला मात्र तसे करणे शक्य नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. यासह विविध ठिकाणच्या सदस्यांनीही प्रश्न मांडले.
यांची होती बैठकीला उपस्थिती
अध्यक्षस्थानी डीआरएम आर.के.यादव होते. वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, मंडळ वाणिज्य प्रबंधक वी.पी.दहाट, वरीष्ठ मंडळ अभियंता (इंजीनियरिंग) राजेश चिखले, वरीष्ठ मंडळ परीचालन प्रबधंक स्वप्निल नीला, वरीष्ठ सिग्नल-दूरसंचार निशांत द्रिवेदी, मंडल सुरक्षा आयुक्त राजेश दीक्षीत, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार, श्याम कुलकर्णी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी तसेच भुसावळ विभागातील रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अनिकेत पाटील (भुसावळ), राजेश सुराणा (भुसावळ), राजेश झंवर (भुसावळ), विजय बाफना (बुलढाणा), नितीन बंग (धुळे), महेश पाटणकर (नाशिक) ज्ञानप्रकाश खंडेलवाल (अकोला), ललित बरडिया (जळगाव), मनोज सोनी (खंडवा), महेंद्र बुरळ (मलकापूर), धर्मा पाटील (पाचोरा), किशोर बोरकर (अमरावती), वसंत बाछुका (अकोला), रवी मलानी (नेपानगर), गणी मेनन (जळगाव), दीपक मायी (अकोला), डॉ सोनाल नंदाश्री (जळगाव), विजय पनपालिया (अकोला), मोहन शर्मा (मलकापूर), महेशराव पाटील (अमळनेर), दिवाकर शिंदे (शेगाव) हे सर्व सदस्य उपस्थित होते. बैठक मध्ये रेल्वे अधिकारी आणि सदस्याची सर्व स्टेशनवरील सुख सुविधांबद्दल चर्चा झाली. मंडळ रेल उपयोगकर्ता सल्लागार समिती सदस्यांनी भुसावळ विभागात सुरू असलेल्या कामांबद्दल चर्चा केली तसेच सुविधांबाबत विविध प्रस्तावही दिले.