हुतात्मा राजगुरू स्मारकासाठी तत्काळ निधी द्यावा

0

नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी केली मुख्यमंत्रीव अर्थमंत्र्याकडे मागणी

राजगुरूनगर : -गेली अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या येथील हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्‍न निधी अभावी प्रलंबित असून त्यासाठी शासनाने तत्काळ निधी उपलब्ध करावा अशी मागणी राजगुरुनगर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांच्याकडे केली आहे. राजगुरुनगर नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर या स्मारकासाठी निधी मिळण्याचा पाठपुरावा सुरु झाला मात्र अजूनही यासाठी पुरेसा निधी उपलब्ध झाला नाही.

86 कोटींचा आराखडा
राजगुरुनगर नगर परिषदेच्यावतीने हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकाला निधी मिळण्याची मागणी केली जात आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पालक मंत्री गिरीश बापट यांच्या लेखी सूचनेच्या माध्यमातून जिल्हाधिकार्‍यांनी सर्व शासकीय विभागाचे एकत्रीकरण करून हुतात्मा शीवरम हरी राजगुरू राष्ट्रीय स्मारकाचा 86.35 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता त्यानंतर सबंधित सर्व विभागाच्या अधिकार्‍यांच्या बैठक घेवून योग्य त्या सूचना दिल्या होत्या. पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्मारकाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. दि.1 फेब्रुवारी 2018 रोजी पुणे येथे जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सबंधित विभागाला स्मारकाच्या आराखड्याचा प्रस्ताव तत्काळ राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे तातडीने पाठवण्याचे आदेश दिले होते.

पहिल्या टप्प्यातील कामासाठी निधीची मागणी
राजगुरुनगर नगर परिषदेच्या माध्यमातून हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्टीय स्मारकाच्या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यान्वित यंत्रणा म्हणून राजगुरुनगर नगर परिषद सक्षम असून पहिल्या टप्प्याचे काम करण्यास निधी उपलब्ध करण्याची मागणी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्य सरकारने हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळस्मारकाच्या कामातील भू संपादनासाठी 14 कोटी 50 लाख रुपये,मोठे पूल व वाहन तळ उभारण्यास 10 कोटी 80 लाख रुपये, नवीन पोहोच रस्ता, आणि वाहन तळ उभारण्यास 3 कोटी 42 लाख रुपये, अंतर्गत रस्ता फुटपाथ आणि पदपथ बनविण्यासाठी 5 कोटी 25 लाख रुपये, रीटेनिग वॉल साठी 4 कोटी 60 लाख रुपये, साईड डेव्हलपमेंट अंतर्गत गेट, सरंक्षक भीत व सुरक्षा यासाठी 3 कोटी 50 लाख रुपये असा 42 कोटी 07 लाख रुपये निधी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. हा निधी राज्य शासनाने तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

याबाबत नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी सांगितले कि, येथील हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकाचे काम मार्गी लावण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु आहे. याबाबत पालकमंत्री व अर्थमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. स्मारकासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी आश्‍वासन दिले आहे. नगर परिषदेच्यामाध्यमातून पहिल्या टप्प्यासाठी 42 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. स्मारकाचा प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न आहे.