हुशारी, जिद्द, मेहनत आणि इच्छा शक्ती असेल तर यश हमखास : उज्वला पळसकर

0

लोणावळा : हुशारी, जिद्द, मेहनत आणि काही तरी करण्याची इच्छा शक्ती असेल तर यश हे हमखास तुमचेच असेल. मला काहीतरी होयचंय याची खूणगाठ मनाशी बांधून त्यादृष्टीने तयारी करा. पण हे करीत असताना त्यात संयम आणि सातत्य ठेवा असा सल्ला पणन संचनालयाच्या उपसंचालक उज्वला माळशिकारे पळसकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

तुंगार्ली, लोणावळा येथील ओमकार तरुण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या ओमकार शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रमात उज्वला माळशिकारे पळसकर बोलत होत्या. ओमकार शिष्यवृत्तीचे हे दुसरे वर्ष असून गुरुकुल विद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार, नगरसेवक राजू बच्चे, रोटरी क्लब ऑफ लोणावळा अध्यक्ष बापू पाटील, ओमकार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ मावकर, गुरुकुलचे मुख्याध्यापक बापुलाल तारे, गोरक्ष गरुड, मंडळाचे शाफिक खलीपा, प्रकाश गवळी, संजय उत्तेकर, सतीश गावडे, किरण येवले, विजय येवले यांच्यासह कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उज्वला माळशिकारे पळसकर यांनी आयुष्यात वेळ आणि काळ हा कुणासाठी थांबत नाही, त्यामुळे त्याचे नियोजन करा, जो यात यशस्वी होईल यश त्यालाच मिळेल असे सांगितले. तसेच स्पर्धा परीक्षा काय आहे हे आधी समजून घेणे महत्त्वाचे असून स्पर्धा परीक्षा देत असताना सर्वात आधी स्पर्धा ही स्वतःची स्वतः सोबत करावी लागते असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

निवडलेल्या क्षेत्रात सर्वोच्च होण्याचे धेय्य समोर ठेवा
मुख्याधिकारी सचिन पवार यांनी कुठल्याही क्षेत्रात जात असताना त्या क्षेत्रात सर्वोच्च होण्याचे धेय्य समोर ठेवा. स्वतःची आवड ओळखायला शिका. त्यात प्राविण्य मिळवा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. ब्रम्हदेव गरुड प्रथम क्रमांकाची, प्रणिता वाघमारे हिला द्वितीय क्रमांकाची तर पंकज पिंपरे याला तृतीत क्रमांकाची शिष्यवृत्ती देण्यात आली. आशिष हुलावळे, दुर्गा हिले, सचिन शिरसाट, मधुरा ढाकोळ, अक्षय जाधव, विकास जैस्वाल या सर्वांना उत्तेजनार्थ शिष्यवृत्ती देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक उमेश इंगुळकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अशोक साळवी यांनी मानले.