नवी दिल्ली : प्राप्तिकर परतावा (आयटीआर) फाईल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. परंतु, फाईलींग करताना प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळांवर अनेक अडचणी आल्याने केंद्रीय अर्थमंत्रालयाने आयटीआर फाईलींगसाठी मुदतवाढ दिली आहे. आता 5 ऑगस्टपर्यंत आयटीआर फाईलींग करता येणार आहे. यापूर्वी प्राप्तिकर परतावा दाखल करण्यासाठी केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देणार नाही, असे बोलले जात होते. त्यानुसार, 31 जुलैला अनेक करदात्यांनी आपले आयटीआर फाईल करण्यासाठी प्राप्तिकर खात्याचे संकेतस्थळ गाठले. त्यावर अनेक तांत्रिक अडचणी येऊ लागल्यानंतर त्याची गांभीर्याने केंद्रीय अर्थमंत्रालयाला दखल घ्यावी लागली व अखेर मुदतवाढ द्यावी लागली. त्यामुळे करदात्यांना काही दिवसांकरिता का होईना दिलासा मिळाला आहे.
शनिवारपासून संकेतस्थळ ठप्प पडले
ऑनलाईन रिटर्न फाईल करण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या सर्व्हरवर ओव्हरलोड आला होता. त्यामुळे संबंधित संकेतस्थळ ठप्प पडले होते. शनिवारी सायंकाळपासूनच हे संकेतस्थळ बंद पडल्याची माहिती करदात्यांच्यावतीने देण्यात आली. इनकम टॅक्स इंडियाचे संकेतस्थळ बंद पडल्यानंतर अर्थमंत्रालयाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या. हे संकेतस्थळ पूर्ववत करण्यासाठीही प्रयत्न झाले. मात्र, अपयश आल्याने अखेर 5 ऑगस्टपर्यंत आयटीआर फाईल करता येईल, असा निर्णय अर्थमंत्रालयाने दिला. वास्तविक पाहाता, 31 जुलै हा प्राप्तिकर परतावा सादर करण्याचा शेवटचा दिवस असतो. दरवर्षी सरकार काही दिवसांची वाढ करत असते. परंतु, यंदा मात्र मुदतवाढ देण्यास नकार देण्यात आला होता. दरम्यान, प्राप्तिकर विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खात्याकडे 31 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स रुपात दोन कोटींपेक्षा अधिक प्राप्तिकर परतावे आलेले आहेत. वेळीच परतावा दाखल करा, असे आवाहन प्राप्तिकर खात्याने करदात्यांना केले होते.
आधार-पॅनची लिंकसक्ती नाही!
प्राप्तिकर परतावा सादर करताना आधारकार्ड व पॅनकार्ड यांची सक्ती करण्याचा निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष करबोर्ड (सीबीडीटी)ने मागे घेतला होता. त्यामुळे या दोन कार्डची लिंकसक्ती आयटीआर फाईल करताना झाली नाही. तरीही करदात्यांना आयटीआर फाईल करताना नाव, जन्मतारीख, लिंग या माहितीसह आधारकार्ड क्रमांक देणे मात्र सक्तीचे करण्यात आले होते. अर्थवर्ष 2016-17च्या टॅक्स स्लॅबनुसार, प्राप्तिकर सवलतीची मर्यादा 60 वर्षांपेक्षा कमी महिला व पुरुषांसाठी अडिच लाख रुपये आहे. तर त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी ती तीन लाख रुपये एवढी आहे. 80 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी पाच लाखापर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त आहे.
ठळक बाबी
आयटीआर फाईलींग करताना 1 जुलैपासून आधारकार्ड अनिवार्य.
नोटाबंदीनंतर खात्यात दोन लाखापेक्षा जास्त रक्कम जमा केली असेल तर विवरण द्यावे लागणार.
इनकम टॅक्स फॉर्म-1 आता अधिक सोपा करण्यात आला आहे.
घरभाडेकरू असाल तर प्राप्तिकरात मिळणारी सुट आता 24 हजारांवरून 60 हजार करण्यात आली आहे.