पुणे । हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, अशक्तपणा यांसारख्या व्याधींनी पुण्यातील अनेक रिक्षाचालक ग्रासल्याचे समोर आले आहे. स्वस्थ सारथी या 3 हजार सीएनजी रिक्षाचालकांसाठी राबविलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीरातील सर्वेक्षणात ही बाब आढळून आली. वाढत्या प्रदूषणाचा फटका सामान्य पुणेकरांप्रमाणे रिक्षाचालकांनाही बसत असून सीएनजी वापर हा यावर उत्तम उपाय आहे. जास्तीत जास्त सीएनजी रिक्षा रस्त्यावर उतराव्या, याकरीता महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीकडून प्रयत्न सुरु असून रिक्षाचालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता हिंद शक्ती सोशल फाऊंडेशनने या शिबीराच्या माध्यमातून रिक्षाचालकांच्या आरोग्यासाठी पुढाकार घेतला होता.
शिवाजीनगर येथील दहा दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा समारोप मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद तांबेकर, वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के, राजेश पांडे, हिंद शक्ती सोशल फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अभय आपटे, सचिव सुनील पांडे, डॉ. सचिन देशपांडे, संजय राऊत, अशोक देवराजन, विवेक नायर, नितीन पवार, अभिनेत्री प्रतिक्षा जाधव उपस्थित होते. डॉक्टर्स फाऊंडेशन फॉर एन्शियंट इंडियन फिलॉसॉफी अॅन्ड मेडिसीन यांचे शिबिरासाठी सहाय्य मिळाले.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, रिक्षाचालक हा महत्वाचा घटक असून तो सातत्याने कार्यरत असतो. त्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्षदेखील होते. रिक्षाचालकांची काळजी घेण्यासाठी अशा प्रकारच्या शिबीरांचे आयोजन केले पाहिजे. प्रदूषण रोखण्याकरीता सीएनजी कीटला देखील महानगरपालिकेकडून अनुदान देण्यात येते.डॉ. सचिन देशपांडे म्हणाले, शिबीरामध्ये 2,700 रिक्षाचालकांनी सहभाग घेतला होता. त्यामधील 323 रिक्षाचालकांना हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, अशक्तपणा, अल्सर यांसारखे आजार मोठया प्रमाणात आढळून आले आहेत. ज्या रिक्षाचालकांना पूर्वीपासूनच विविध व्याधींनी ग्रासले होते, त्यांनादेखील योग्य उपचार देण्यात आले. डोळ्यांच्या तपासणीमध्ये अनेक रिक्षाचालकांना मोतीबिंदूचा आजार आढळून आला.