हृदय रोग्यांना सावधानतेचा इशारा
मुंबई:- माणसाच्या हृदयातील नसामध्ये ब्लॉकेज कमी करण्यासाठी स्टेंट (stents) चा वापर करण्यात येतो. मात्र मर्यादेपेक्षा जास्त स्टेंटचा वापर केला तर मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात असल्याचे एका संशोधनातून समोेर आले आहे. सरकारी योजनेतून हृदयामध्ये स्टेंट टाकण्यात आलेल्या रूग्णांचा अभ्यास केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. रूग्णांना त्यांच्या हृदयाच्या नसामध्ये ब्लॉकेज असेल तर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ही शस्त्रक्रिया विमा योजनेमध्ये घेण्यात आली. २०१२ साली राजीव गांधी आरोग्य विमा योजनेमध्ये ह्दयाची शस्त्रक्रिया समाविष्ट करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना ह्दयाची शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येत होती. शस्त्रक्रिया करत असतांना येणारा महागडा खर्च हा शासनाकडून देण्यात येत होता.
राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात असतांना या योजनेचा सामान्य लोकांना कितपत फायदा झाला याचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन आरोग्य सचिव मीता राजीवलोचन यांनी या योजनेतील ह्दयावरील शस्त्रक्रियेच्या बाबत अभ्यास करण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार संशोधन करण्यासाठी डॉक्टर संशोधकांनी संशोधन केले आणि आवश्यकता नसतांना देखील जास्त स्टेंट टाकल्यामुळे रूग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
एम्सच्या टीमने केला अभ्यास –
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, ऋषिकेश येथील ह्दयरोग विभागाच्या प्रमुख डॉ. भानू दुग्गल यांनी ५ हजार रूग्णांचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढले आहेत. यामध्ये २०१२ ते २०१६ या कालावधीमध्ये शासकीय योजनेतून करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेच्या रूग्णांचा अभ्यास केला. रूग्णांच्या मुलाखती घेतल्या आहेत. यामध्ये एकापेक्षा जास्त स्टेंट टाकलेले अडीचशे पेक्षा जास्त रूग्ण हे दगावले असल्याचे समोर आले आहे.
राज्यातील ११० रूग्णालयातील रूग्णांचा अभ्यास
राज्यातील सर्व जिल्ह्यातील ११० रूग्णालयातील रूग्णांचा अभ्यास यामध्ये करण्यात आलेला आहे. टाकण्यात आलेले स्टेंट, रूग्णाचे वय, लिंग आणि मृत्यूचे प्रमाण यांचा अभ्यास कऱण्यात आलेला आहे. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत. यामध्ये गरज नसतांना देखील स्टेंट टाकलेले असल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
रूग्णांलयांना मानांकन सिस्टीम सुरू करा
रूग्णालयात शस्त्रक्रिया करत असतांना अमेरिके सारखी आपल्या देशातही मानांकन सिस्टीम सुरू करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. यामध्ये जी रूग्णालय अनावश्यक चाचण्या न करता शस्त्रक्रिया करतात अशां रूग्णांलयांना मानांकन देण्यात यावे जेणे करून रूग्णांना देखील कोणत्या रूग्णालयात उपचार करायचे याची माहिती होईल असेही सुचविण्यात आले आहे. हृदयाचे उपचार करत असतांना जर शस्त्रक्रिया करायची असेल तर अशी शस्त्रक्रिया करत असतांना तीन डॉक्टरांची टीम करून जर तीघांचे मत होत असेल तरच शस्त्रक्रिया करण्यात यावी अशाही सूचना या अभ्यास करणाऱ्या गटाने केलेल्या आहेत.