हृदयाला आरोग्याच्या केंद्रस्थानी ठेवून संतुलीत आहार घ्यावा

0

भुसावळ । आपण काय खातो यावर आपलं सगळं आरोग्य अवलंबून असतं. ह्रदयाचं आरोग्य ज्या अनेक गोष्टींवर अवलंबून असतं त्यात आहार हा महत्वाचा घटक आहे. आपल्या शरीराचं सगळं कार्य सुरळीत चालावं यासाठी आपण आहाराकडे खूप काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवं. शरीराला सर्व प्रकारची आवश्यक जीवनसत्वं, खनिजं मिळाली पाहिजेत. आपला आहार वयानुरूप आणि दिनचर्येनुसार असायला हवा. आरोग्याच्या केंद्रस्थानी आपलं ‘ह्रदय’ असायला हवं. अलिकडे लहान वयातले वाढते विकार पाहिले, त्यांचं वाढतं प्रमाण पाहिलं की प्रत्येकाने संतुलित आहार घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन हृदयरोगतज्ञ डॉ. जे.बी.राजपूत यांनी केले. वेडीमाता ज्येष्ठ नागरीक संघाची बैठक रविवार, 10 रोजी सकाळी 10 वाजता भुसावळ हायस्कुलमध्ये घेण्यात आली. हृदयरोगतज्ञ डॉ. जे.बी.राजपूत यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. प्रसंगी आरोग्याविषयी सल्ला व ज्येष्ठांच्या मनातील शंकांचे निरसनही केले.

आरोग्यासाठी दिनचर्या ठरवावी
आजच्या धकाधकीच्या, तणावाच्या दिनचर्येत आपण ह्रदयाचाच विचार करत नाही. नुसती काळजी करुन उपयोग नाही तर त्याची योग्य ती ‘काळजी घेतली’ पाहिजे. ह्रदयाची स्पंदनं व्यवस्थित चालावीत असं वाटत असेल तर सर्वप्रथम आपण दिनचर्येचा विचार केला पाहिजे. त्यात काही गडबड असेल तर ती दूर केली पाहिजे. झोपण्याच्या वेळा नियमीत आणि ठरलेल्या असायला हव्यात. कधीही झोपणे आणि कधीही उठणे हे सर्व रोगांचं मूळ आहे. शरीराला आणि मनाला पाच ते आठ तासांची पूर्ण विश्रांती अत्यावश्यक असल्याचेही डॉ. राजपूत यांनी सांगितले. जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय ढाके यांनी देखील जेष्ठांना मार्गदर्शन केले.