बारामती । जिल्ह्यातील ज्या रुग्णांना मेंदू विकार किंवा हृदय रोग या आजारांची शस्त्रक्रिया करावयाची असेल अशा रुग्णांना जिल्हा परिषदेच्या वतीने 25 हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी दिली. बारामती येथील महाआरोग्य शिबीरात देवकाते बोलत होते. जिल्हापरिषद अशा रुग्णांना 15 हजार रुपयांची मदत करत होती. यात आता 10 हजार रुपये वाढीव मदत करण्याचा निर्णय जिल्हापरिषदेच्या वतीने राज्यशासनाला पाठविण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्यांना चांगलाच आधार मिळणार आहे, असेही देवकाते यांनी सांगितले.
शिबीरासाठी एसटीची सुविधा
बारामतीतील शासकिय महिला रूग्णालयात महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात जवळपास 20 हजाराच्यावर रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबीरात महिलांची संख्या लक्षणीय होती. शिबीरात येणार्या रुग्णांसाठी एस.टी.बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
यांची होती उपस्थिती
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हापरिषदेचा आरोग्य विभाग, जि. प. सदस्य रोहीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शासकीय महिला रुग्णालयात महाआरोग्या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीराचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. आमदार जगन्नाथ शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, आरोग्य सभापती प्रविण माने, नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष जय पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.