हॅकर खोटारडे मग माझ्या बाबतीच का ठेवला गेला विश्‍वास !

0

माजी मंत्री एकनाथराव खडसेंचा सवाल ; मिडीया ट्रायलमुळे आयुष्य उद्ध्वस्त

फैजपूर- हॅकर हे खोटारडे असतात, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, असे पक्षाने सांगितले मात्र माझ्या बाबतीतही हॅकर मनीष भंगाळेने माझे दाऊदसोबत संभाषण असल्याचे सांगितले होते व त्याच्या बोलण्यावर त्यावेळी विश्‍वास कसा ठेवण्यात आला? असा प्रश्‍न माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे उपस्थित केला. फैजपूर येथे पत्रकार संघाच्या वातानुकूलित पत्रकार परीषद हॉलच्या उद्घाटनप्रसंगी खडसे बोलत होते. ते म्हणाले की, हॅकर मनीष भंगाळेन माझ्यावर जे आरोप केले हे कसे खरे मानण्यात आले? त्यानंतर झालेल्या मीडिया ट्रायलमुळे मला माझ्या पदाचा राजीनामा द्यावा लागला व मीडिया ट्रायलमुळे एखाद्याचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते, अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली.

खडसेंनी पुन्हा पक्षावर साधला निशाणा
वेगवेगवळ्या आरोपांमुळे सुमारे दोन वर्षांपासून मंत्री मंडळाबाहेर असलेले माजी मंत्री खडसे पक्षावर कमालीचे नाराज आहेत. विविध आरोपातून त्यांना क्लीनचीट मिळाल्यानंतर पक्ष दखल घेत नसल्याचे शल्य आहे त्यामुळे अधून-मधून ते पक्षावर टिकेची तोफ डागत आहेत. त्यातच भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या ईव्हीएम मशीनच्या माहितीमुळे झाली असल्याचा दावा अमेरीकेतील हॅकर सय्यद शुजा याने अलिकडेच केल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर पक्षाने हॅकर हे खोटारडे असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, अशी भूमिका भाजपाने मांडली होती. या भूमिकेचा आधार घेत खडसे यांनी फैजपूर येथे पुन्हा पक्षाला लक्ष्य करीत हॅकर जर खोटारडे असतात तर मग माझ्या बाबतीतही हॅकर मनीष भंगाळे याने माझ्यावर दाऊद सोबत संभाषणाचा दावा केला होता मग त्याच्यावर का विश्वास ठेवण्यात आला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माजी मंत्री एकनाथराव खडसे व अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यात दूरध्वनीद्वारे संभाषण झाल्याचा व त्याचे कॉल डिटेल्स आपल्याकडे असल्याचा दावा हॅकर मनीष भंगाळेने केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाअंती खडसे यांना क्लीन चीट दिली होती.