ठाणे । ठाण्याच्या नुबैरशाह शेखने राज्य बद्धिबळ स्पर्धेतला आपला दबदबा कायम राखला. पुणे येथे झालेल्या 19 वर्षांखालील गटात अव्वल स्थान राखत आंतरराष्ट्रीय मास्टर नुबैरशाहने हॅट्ट्रिकसह विक्रमी 12 वे राज्य अजिंक्यपद आपल्या नावे केले. 19 वषार्ंखालील गटातील नुबैरशाहचे हे तिसरे विजेतेपद आहे. वायएमसीए आयोजित राज्यनिवड चाचणी आणि अजिंक्यपद स्पर्धेत अपराजित राहताना नुबैरशाहने नऊ फेरींंमध्ये नऊ गुण मिळवले. आठव्या फेरीतच नुबैरशाहने विजेतेपद निश्चित केले होते.
शेवटच्या नवव्या फेरीत यजमान संघटनेच्या दिगंबर जाईलला हरवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दुसर्या स्थानावर राहिलेल्या जाईल आणि नुबैरशाहमध्ये 3 गुणांचा फरक होता. ग्रॅण्डमास्टर किताबाकडे वाटचाल करणार्या नुबैरशाहला या विजयामुळे 10 गुण मिळाले नुबैरशाह 3 ते 11 सप्टेंबर दरम्यान पाटणा येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करेल.वयाच्या सातव्या वर्षापासून स्पर्धात्मक बुद्धिबळ खेळणार्या नुबैरशाहने 2005 मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत आठ फेरींच्या लढतीत सात विजय, एक सामना बरोबरीत राखत 7 वर्ष गटात विजय मिळवला होता.
त्यानंतर त्याने एकही पराभव न स्विकारता राज्य अजिंक्यपद स्पर्धेत बाजी मारली आहे. नुबैरशाह 12 वर्षांचा असताना 2010 मध्ये औरंगाबादमध्ये झालेल्या खुल्या गटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झाला होता. आंतरराष्ट्रीय मास्टर, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना मागे टाकत नुबैरशाहने नऊ फेर्यांच्या लढतीत सहा विजय आणि तीन सामने बरोबरीत सोडवत अजिंक्यपद मिळवले होते. अवघ्या 12 वर्षी खुल्या गटाची राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा राज्यातला तो एकमेव बुद्धिबळपटू आहे. मुंबईत झालेल्या राज्य अजिंक्यपदाच्या खुल्या गटातील जलद बुद्धिबळ स्पर्धा जिंकली होती.