भाजपा, राष्ट्रवादीचे स्वतंत्र ‘तगडे’ उमेदवार असल्याची चर्चा
पिंपरी-चिंचवड (बापू जगदाळे) : जिल्ह्याबरोबरच राज्यातही शिरुरचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी सलग तीन वेळा चढ्या मताधिक्याने विजयं मिळविला आहे. आता 2019 साठीही त्यांनी दंड थोपटले आहेत. सध्या राज्यस्तरावर भाजप व शिवसेनेचे सख्य पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत युती असण्याची शक्यता खूप कमी आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मतदारसंघात भाजपाचा उमेदवार असेल. मात्र, मध्यंतरी परिवर्तनाच्या काळात भाजपाकडे झुकलेली परप्रांतीयांची मते कोणाकडे वळता यावर बरेचसे चित्र अवलंबून आहे. तसेच नेहमी आतून साथ देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वत:चाच तगडा उमेदवार देवून फुटणारी मते रोखेल, अशीही चर्चा आहे. यामुळे एकंदरीत आढळरावांना निवडणूक सोपी जाणार नाही, असा राजकीय वर्तुळात अंदाज आहे.
आमदार महेश लांडगेंना बळ
लोकसभेची निवडणुक ही सर्वच प्रमुख पक्षांसाठी महत्वाची ठरणार आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टी बरोबरच, राष्ट्रवादी व शिवसेनेसाठी देखील राज्यात लोकसभेच्या लढती आता प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. अशीच प्रतिष्ठेची रंगत शिरुर मतदार संघात मतदारांना अनुभवण्यास मिळणार आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार आढळराव यांनी हॅटट्रिक करत दबदबा ठेवला आहे. मोदी लाटेचे भांडवल करुन भाजपाला आपल्यापुढे सर्वच पक्ष निष्क्रीय असल्याचे वाटत आहे. त्यामुळे राज्यात तरी स्वबळावर लढण्याची त्यांनी जोरदार तयारी देखील सूरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भोसरी मतदारसंघातील भाजपाचे सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे यांना शिरुरमधून लढण्यास रसद दिली जात आहे; पण लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्रीत झाल्यास लांडगे काय भूमिका घेतात हे देखील महत्वाचे आहे. पण आढळराव यांनी अद्यापही लांडगे यांना आपला प्रतिस्पर्धी मानलेले नाही. म्हणूनच अनेक भाषणांत विरोधक म्हणून त्यांचे कधीही नाव घेत नाहीत. असे असले तरी खासदारकीचा उमेदवार म्हणून लांडगे यांनी आपले ब्रँडीग मोठ्या प्रमाणात करण्यात यश मिळवले आहे. त्यामध्ये बैलगाढा आंदोलनाचा महत्वाचा वाटा आहे.
परप्रांतीयांची लाखो मते
या मतदारसंघात भोसरी, हडपसर, शिरुर, खेड-आळंदी, आंबेगाव, जुन्नर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये भाजपाचे तीन शिवसेना, मनसे व राष्ट्रवादीचा एक-ऐक आमदार आहे. तर, जुन्नरचे शरद सोनवणे कधी भाजप, तर कधी शिवसेना असा तळ्यात मळ्यातला खेळ खेळत आहेत. भाजपाकडे सध्यातरी महेश लांडगे यांच्याशिवाय सक्षम पर्याय दिसत नाही. तर राष्ट्रवादीला या वेळेसही उमेदवाराची शोधाशोध करुन कुणालातरी बळीचा बकरा बनविण्याशिवाय गत्यंतर दिसत नाही. त्यामुळेच नेहमी सर्व तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आढळरावांना छुप्या पध्दतीने नेहमीच मदत केली आहे. तसेच युतीमुळे देखील आढळरावांची ताकद नेहमीच वरचढ ठरत होती. मात्र, आताची परिस्थिती वेगळी असल्यामुळे भाजपा व शिवसेनेची युती होणे सध्यातरी शक्य वाटत नाही. त्यामुळे भाजपाची मते आत्तापर्यत किती होती, हे फक्त अंदाजेच गृहीत धरले जात होते. पण मघील परिवर्तनाच्या लाटेत या मतांमध्ये बरीच वाढ झाली आहे. यामध्ये परप्रांतीय मतांचाही टक्का वधारलेला आहे. हीच मोठी डोकेदुखी शिवसेनेची ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचेच मत आहे. कारण या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात औद्योगीक पट्टा पसरला असून या पट्ट्यात परप्रांतियांचे देखील मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. त्यामध्येच भोसरी, हडपसर व चाकण पट्टा त्यातच गणला जातो. अनेकदा परप्रांतीय मतदारांकडून स्थानिक पक्षाला कधीही पसंती दिली जात नाही. हा आजवरचा इतिहास आहे. पण स्थानिक नेते मंडळी परप्रांतियाला बरोबरच घेउनच राजकारण करतात ही देखील शोकांतिका आहे. यानुसार हडपसर, भोसरी व इतर भागातील लाखो परप्रांतीय मते कुणाच्या पारड्यात पडतात यावर देखील भाजपाची गणिते जुळणार आहेत.
लांडे व आढळराव यांची वाढली जवळिक
राजकारणात एक मत नेहमीच अनुभवास मिळते. ते म्हणजे राजकारणात कोण कुणाचा मित्र वा शत्रू नसतो. याचा प्रत्यय देखील शहरातील राजकारणात अनेकदा मतदारांना अनुभवायला मिळाला आहे. 2009 साली शिरुर लोकसभा मतदारसंघातून विलास लांडे हे आढळरावांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार होते. तर 2014 च्या विधानसभेच्या निवडणुक वेळी आमदार लांडगे हे शिवसेनेचे तिकीट मिळवण्यासाठी आढळरावांच्या माध्यमातून देखील प्रयत्नशिल होत. म्हणजे ते त्यावेळी एकत्रच होते, अशी चर्चा होती. तर लांडेचा विधानसभेवेळी झालेला पराभव खासदार आढळराव व लांडे यांच्यात मैत्री फुलवण्यास कारणीभूत ठरला असून, यांची वाढलेली जवळीक कोणती राजकीय दिशा ठरवते हे देखील उत्सकेताचा विषय ठरणार आहे.