पुकेकोहे । भारतीय महिला हॉकी संघाला सध्या ’बुरे दिन’ आले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या हॉकी मालिकेतील तिसर्या लढतीत देखील भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला. बुधवारी झालेल्या लढतीत यजमान न्यूजीलंडने भारतीय संघाला 3-2 असे पराभूत केले. या शानदार विजयासह न्यूझीलंडने मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात किवीज संघाने भारताला 4-1 असे तर दुसर्या सामन्यात 8-2 असे पराभूत केले होते.
धडाकेबाज प्रारंभ करताना सामन्यातील नवव्या मिनिटाला दीप ग्रेस एक्काने पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पण, लगेचच 13 व्या मिनिटाला इला गुन्सनने शानदार गोल करत किवीज संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. यानंतर, 15 व्या मिनिटाला डेना रिचीने मैदानी गोल नोंदवताना किवीज संघाची आघाडी 2-0 ने वाढवली. दुसर्या सत्रात भारतीय संघाला सलग दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवण्यात अपयश आले. मध्यंतरापर्यंत किवीज संघाकडे 2-1 अशी आघाडी कायम होती.
तिस़र्या सत्रात 39 व्या मिनिटाला शिलोह ग्लोनने पुन्हा एकदा गोल करत न्यूझीलंडची आघाडी 3-1 ने वाढवली. सामना संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना सविताने पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना भारतीय संघाची आघाडी 3-2 अशी कमी केली. शेवटच्या मिनिटात भारतीय संघाला गोल नोंदवण्यात अपयश आल्याने या सामन्यातही भारतला 3-2 असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. आता भारतीय संघाची चौथी लढत दि. 19 रोजी होईल.