हॅरिस पुलावर स्कूल बस जळून खाक

0

पिंपरी-चिंचवड : पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथील हॅरिस पुलावर विद्यार्थी वाहतूक करणार्‍या मिनीबसने सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून विद्यार्थ्यांना योग्यवेळी बसमधून बाहेर काढल्याने कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र ती स्कूल बस पूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेमुळे दापोडी-बोपोडी परिसरात वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. हॅरिस पुलाच्या मधोमध बसने पेट घेतला होता व आगीच्या ज्वाळा उठल्या होता. द बर्निंग बसचा हा थरार अनेकांनी अनुभवला.

बंब पोहचण्यापूर्वीच बस खाक
दापोडीकडून खडकीच्या दिशेने जात असलेल्या एका स्कूलबसमधून अचानक धूर येऊ लागला व आग भडकली. बसचालकाने जवळील पाण्याच्या बाटलीतील पाणी ओतून आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आग चांगलीच भडकल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बसचालकाने बसमधील पाच-सहा विद्यार्थ्यांना बाहेर काढले व त्यांना बरोबर घेऊन तो निघून गेला, अशी माहिती या घटनेचे प्रत्यक्षदर्शी बाबा भिका माळी यांनी दिली. महापालिका अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.

उकाड्यात वाहतूक कोंडीची भर
चालक बस सोडून निघून गेल्यामुळे ती कोणत्या शाळेची स्कूल बस होती, याबाबत पोलिसांना अजून माहिती मिळू शकली नाही. दापोडीकडून खडकीच्या दिशेने जाणारी स्कूल बस हॅरिस पुलावर मधोमध पेटल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. काही वाहनचालकांनी मुंबईकडे जाणार्‍या बाजूने वाहने पुढे दामटण्याचा प्रयत्न केल्यामुळे दुसर्‍या बाजूलाही वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. दुपारी तीनपर्यंत या परिसरातील वाहतूक अत्यंत मंदगतीने सुरू असल्याचे पाहायला मिळत होते. आधीच प्रचंड उकाडा आणि त्यात वाहतूक कोंडी यामुळे वाहनचालक व प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.