हॅरिस समांतर पुलाचे काम अंतिम टप्प्यात

0

वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटण्यास मदत

पिंपरी-चिंचवड : शहराची औद्योगिक नगरीसोबतच मोठ्या उड्डाणपुलांचे आणि सुसज्ज वाहतूक व्यवस्था असलेले शहर म्हणूनही ओळख आहे. मात्र पुणे शहराकडून पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करतानाच नागरिकांना मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. हॅरिस पुलावरील वाहतूक कोंडी नित्याचीच बाब बनली आहे. या पुलावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हॅरिस पुलाला समांतर नवीन पूल बांधण्यात आला आहे. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून हा पूल तयार झाल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटेल.

एका वर्षात काम पूर्णत्वाकडे
हॅरिस पुलाला समांतर पूल बांधण्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनेकदा योजिले होते. मात्र पुलाजवळ असलेल्या घरांमुळे या कामाला सुरुवात होत नव्हती. तसेच पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका या दोन्हींची हद्द या ठिकाणी असल्याने देखील कामामध्ये काही प्रमाणात दिरंगाई होत असे. हद्दीचा वाद संपवून चालढकल होत असलेल्या पुलाच्या कामाला मागील वर्षी सुरुवात झाली. एक वर्षात या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

शहरात प्रवेशासाठी नवा पूल
हॅरिस पुलाला समांतर दोन पुलांचे काम सुरु असून एक पूल पुण्याकडून पिंपरी-चिंचवड शहराकडे येण्यासाठी तर एक पूल पिंपरी-चिंचवड शहराकडून पुणे शहराकडे जाण्यासाठी वापरण्यात येईल. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात सुटेल. सकाळी व सायंकाळच्या सुमारास या रस्त्याने जाताना नागरिक शहरांतर्गत रस्त्यांचा पर्याय निवडत होते. मात्र हे दोन्ही पूल सुरु झाल्यानंतर या मार्गावरून जाण्यास नागरिक मोठ्या प्रमाणात पसंती देतील.