भुसावळ : शहरातील रेल्वे ऑफिसर कॉलनीतील लग्न घरातून हॅलोजन लाईटांसह सिलिंडर लांबवणार्या तिघा आरोपींना शहर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अटक केली. आरोपींच्या ताब्यातून 10 हजार 700 रुपये किंमतीचे तीन हॅलोजन व एक सिलिंडर जप्त झाले. सहा.पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्यासह पथकाने वेगवेगळ्या दोन गुन्ह्यांची उकल केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
लग्न घरातून केली चोरी
तक्रारदार विशाखा फुलकुमार गौतम (42, रेल्वे ऑफिसर कॉलनी, भुसावळ) यांचा मुलगा मुलगा आशितोष सिद्धार्थ भालेरावचे 29 ऑक्टोबर रोजी लग्न असल्याने भुसावळातील बाळू लाईट यांच्याकडून घरासाठी व कुंपणात मंडप व सहा मेटल हॅलोजन लावण्यात आले होते. लग्न झाल्यानंतर दुसर्या दिवशी 11 वाजेच्या सुमारास मंडप डेकारेटर्सकडील लोक आल्यानंतर तीन हॅलोजनची तसेच घरातील एका सिलिंडरची चोरी झाल्याचे लक्षात आले. तीनही आरोपींनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी जाळ्यात
शहर पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर शिवकुमार भिन्नू शर्मा (30), सोनू राजेंद्र श्रीवास (18) व आकाश रमेश परदेशी (21, सर्व रा.फिल्टर हाऊस, कवाडे नगर, भुसावळ) यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली. अन्य काही चोर्या उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, हवालदार गजानन देशमुख, विनोद वितकर, साहील तडवी, समाधान पाटील, कमलाकर बागुल आदींनी आरोपींना अटक केली. रविवारी आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.