हेगडेंच्या महात्मा गांधींबाबतच्या वक्तव्यावर भाजप नाराज: बजावली नोटीस !

0

नवी दिल्ली: भाजप नेते खासदार अनंतकुमार हेगडे यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वादग्रस्त वक्तव्य केले होते. अनंतकुमार हेगडे यांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कर्नाटक भाजपचे प्रमुख नलिन कुमार कटील यांनी ही माहिती दिली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हेगडे यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतल्याचे ते म्हणाले.

महात्मा गांधी यांनी इंग्रजांसबोत करार केला होता. ज्या स्वतंत्र सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले, महात्मा गांधी यांनी केवळ सत्याग्रह करून स्वातंत्र्य मिळवून दिल्याचा दावा केला आहे. त्यावरच ते महापुरुष बनल्याचे वादग्रस्त वक्तव्य हेगडे यांनी केले होते. बंगळुरू येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान हेगडे यांच्या वक्तव्यावर भाजप नेतृत्वाने तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हेगडे यांना जाहीर माफी मागावी लागू शकते. पक्षाच्या सुत्रांनी या संदर्भात माहिती दिली. तसेच महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य सहन केले जाणार नाही, अशी भूमिका पक्ष नेतृत्वाने घेतल्याचे समजते.