मुंबई: देवेंद्र फडणवीस हे ८० तासासाठी मुख्यमंत्री झाले, त्यामागे केंद्राकडून मिळालेला निधी परत पाठविण्याचा उद्देश होता असा खळबळजनक खुलासा भाजपचे खासदार माजी मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केला. दरम्यान याबाबत माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अनंत कुमार हेगडे यांचा दावा फेटाळून लावला आहे. “केंद्राला एक नवा पैसाही परत पाठवलेला नाही, केंद्राकडून पैसा आलाच नाही, शिवाय काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही”, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
“देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रावादीचे नेते अजित पवारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणे ही एक राजकीय खेळी होती. फडणवीस हे 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवले”, असा दावा भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
अनंत हेगडेंचा दावा शंभर टक्के धादांत खोटा आणि चुकीचा आहे. एक नवा पैसादेखील महाराष्ट्राने केंद्र सरकारला परत केलेला नाही. मुळातच बुलेट ट्रेनकरिता एक नवा पैसा केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला मिळालेला नाही. बुलेट ट्रेनसाठी एक कंपनी तयार झालेली आहे. जी केंद्र सरकारची आहे. जेव्हा केव्हा बुलेट ट्रेनचे पैसे येतील, तेव्हा ते पैसे या कंपनीमध्ये येतील, महाराष्ट्र सरकारकडे येणार नाही. महाराष्ट्र सरकारची भूमिका ही केवळ जमीन हस्तांतरणाची आहे असे फडणवीस यांनी म्हटले आहे.