हेतुपुरस्सर बंद पाडणार्‍यावर कारवाई करणार

0

मुंबई । नंदुरबार शहरात मागील वर्षात दोन महिन्यात तब्बल चार वेळा बंद पाळण्यात आले होते. नंदुरबार हे शहर जिल्ह्याचे शहर असल्याने जिल्ह्याभरातील नागरिक दैनंदिन कामकाजासाठी येथे येत असतात. मात्र सत्ताधारी पक्षातील काही लोक हेतुपुरस्कार शहर बंद पाडतात. हे चुकीचे असून अशा समाजकंटकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधान परिषदेत केल्यानंतर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी चौकशी करण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. नंदुरबार शहर भीमा-कोरेगाव प्रकरणामुळे, एका मुलीच्या आत्महत्येमुळे तसेच पद्मावती चित्रपटावर बंदी आणण्याच्या मागणीसाठी बंद पाळण्यास आले होते, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

सत्ताधार्‍यांचा चारवेळा बेकायदेशीर बंद
बेकायदेशीररित्या चार वेळा गाव बंद केले जाते, यामागे सत्ताधारी पक्षातील लोकांचे कारनामे असून मुख्यमंत्री यांनी सत्ताधारी पक्षातील लोकांना प्रशिक्षण द्यावे असा टोला आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी लगावला. नंदुरबार जिल्हा हा पूर्णतः आदिवासी जिल्हा आहे. मात्र अशा प्रकारे वारंवार बंद पाडण्यात येऊन नागरिकांमध्ये भितीदायक वातावरण निर्माण करण्याचे काम केले जातात. बंद काळात नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण होते. खायला देखील काही नसते त्यामुळे केवळ खिचडी खाऊन लोकांना दिवस काढावे लागत असल्याचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी निदर्शनात आणून दिले.