हेतुपुरस्सर मराठवाड्यावर अन्याय केल्यास तीव्र आंदोलन छेडू; पंकजा मुंडेच्या उपोषणस्थळी फडणवीसांचा इशारा !

0

औरंगाबाद: माजी मंत्री भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज सोमवारी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी एकदिवशीय लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. औरंगाबाद येथे हे उपोषण सुरु आहे. पंकजा मुंडे यांच्या उपोषणात माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार पंकजा मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सहभाग नोंदविला. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोगत व्यक्त केले.

भाजप सरकारच्या काळात मराठवाड्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे झाली. ती कामे अविरतपणे पुढे न्यावे अशी देवेंद्र फडणवीस मागणी केली. मराठवाड्याच्या पाणी प्रश्न सोडविला नाही तर या सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. आज लाक्षणिक उपोषण आहे, सरकारने याची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आघाडीच्या काळात मराठवाड्यावर अन्याय झाल्याचे आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांच्या हिताची होती, मात्र महाविकास आघाडीच्या सरकारकडून ही योजना रद्द करण्याचे प्रयत्न सुरु आहे. राजकारण करू नका, ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असल्याने ही योजना बंद करू नका अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. मराठवाड्याचा विकासासाठी विरोधी पक्ष म्हणून सर्व सहकार्य करू मात्र हेतुपुरस्सर खोडा घालण्याचा प्रयत्न केल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला.