नवी दिल्ली : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर भाजपकडून भोपाळमधून निवडणूक लढवीत आहे. त्यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेले अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. याविषयी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी हेमंत करकरे हे प्रामाणिक आणि कटीबद्ध अधिकारी होते. मुंबई दशतवादी हल्ल्यात लोकांना वाचवताना ते शहीद झाले, असे सांगितले.
हेमंत करकरेंनी मला खूप त्रास दिला. करकरे यांना ज्यादिवसी दहशतवाद्यांनी मारले त्या दिवशी माझे सुतक संपले असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञा यांनी केले होते.
मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. भाजपाकडून दोनदिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यावेळी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भोपाळ मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार आलोक सांजर यांनी 7.14 लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पी.सी.शर्मा यांनी 3.43 लाख मतं मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून भोपाळ मतदार संघातून दिग्विजय सिंह यांनी मैदानात उतरविण्यात आले आहे. तर, भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.