हेमु कलानी यांचा देशसेवेसाठी मोठा त्याग : गिरीश बापट

0

पुतळ्याचे काम लवकर करण्याच्या प्रशासनाला सूचना

पिंपरी : हेमू कलानी यांचा कैदेत असताना अतोनात छळ झाला. तरी सुद्धा त्यांनी आपल्या सहकार्‍याची नावे इंग्रजांना सांगितली नाही. हेच खरे त्यांचे राष्ट्रप्रेम आहे. हेमू कलानी यांचा देशसेवेसाठी फार मोठा त्याग आहे, असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने आज (गुरुवारी) पिंपरीमधील शहीद हेमू कलानी अर्धपुतळ्याच्या चौथार्‍याचे भुमिपूजन व उद्यान सुशोभिकरण कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौगुले, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेवक संदीप वाघेरे, डब्बु आसवानी, निकीता कदम, उषा वाघेरे, स्वीकृत सदस्य मोरेश्‍वर शेडगे, माजी नगरसेविका ज्योतिका मलकानी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, उद्यान अधीक्षक दत्तात्रय गायकवाड, अमोल थोरात, सिंधु सेवा संगम संस्थेचे कमल मलकानी, श्रीचंद संगदील, शिव इदनानी, अशोक पुनजाबी, हिरो आहुजा, मधु सबनानी, जवाहर कोटवानी, संतोष कुदळे आदी उपस्थित होते.

पुतळ्यामुळे सर्वांना स्फूर्ती
आमदार बापट म्हणाले पुढे म्हणाले की, हेमू कलानी यांचे चरित्र आपण वाचले पाहिजे. शहीद हेमू कलानी यांचा देशाच्या स्वतंत्र्यासाठी मोठा त्याग असून त्यांच्या या ठिकाणी होत असलेल्या पुतळ्यामुळे सर्वांना स्फूर्ती मिळेल. या उद्यानाचे व पुतळ्याचे काम उत्तम दर्जाचे व लवकर पूर्ण करावे. महापालिका प्रशासनाने या पुतळ्यांच्या स्वच्छतेचे आणि त्यांची निगा राखण्याचे काम केले पाहिजे. फक्त पुतळे बसवून उपयोग नाही. तर त्यांच्या देखभालीचे कामही महापालिका प्रशासनाने केले पाहिजे.

एक अद्भूत स्वातंत्र्यसेनानी
खासदार साबळे म्हणाले की, अखंड भारत निर्माण करण्यासाठीचे शहीद हेमू कलानी यांचे स्वप्न साकार होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. स्वतंत्र भारताच्या निर्माणामधील शहीद हेमू कलानी हे एक अदभूत स्वातंत्र्य सेनानी होते. आमदार जगताप म्हणाले की, अखंड भारत वर्षातील शहीद हेमू कलानी हे आदर्श स्वातंत्र्यसेनानी होते. शहीद हेमू कलानी यांचा पुतळा उभारण्यासाठी ज्यांनी या कामासाठी पाठपुरावा केला त्यांचे आभार मानले पाहिजेत

संदीप वाघेरे यांनी प्रास्ताविक केले. रमेश भोसले सूत्रसंचालन यांनी केले. तर दादा पमनाणी यांनी आभार मानले.