हेरिटेज वॉकमध्ये परदेशी पाहुण्यांसह सेलिब्रेटींही होणार सहभागी

0

स्वरूप संपत, शर्वरी जमेनीस, गिरीजा ओक, नीतू खोसला आदी होणार सहभागी

लोणावळा : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारश्यांची युनेस्कोच्या यादीत नोंद होण्याच्या उद्देशाने मावळातील जगप्रसिद्ध भाजे लेणी ते लोहगड किल्ला दरम्यान रविवारी (दि.10) आयोजित संपर्क हेरिटेज वॉकमध्ये अनेक परदेशी पाहुण्यांसह सेलिब्रेटीही मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती संपर्क हेरिटेज वॉकचे प्रमुख निमंत्रक अमितकुमार बॅनर्जी यांनी दिली. मावळ तालुक्याला ऐतिहासिक वास्तुंचा मोठा वारसा असून, त्यांचे जतन करण्याबरोबरच युनेस्कोच्या यादीत नोंद झाल्यास मावळच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. या परिसरात भाजे लेणी, लोहगड व विसापूर किल्ला, कार्ला लेणी, बेडसे लेणी आदी इतिहासाची साक्ष देणारी जगप्रसिद्ध ठिकाणे असून, या वॉकमधून देश तसेच परदेशातून येणार्‍या नागरिकांना महाराष्ट्राची संस्कृती व वारशाची माहिती मिळणार आहे.

यांचा असणार सहभाग
दरम्यान, या हेरिटेज वॉकमध्ये सेलिब्रेटी स्वरुप संपत, शर्वरी जमेनिस, गिरिजा ओक, मिसेस इंडिया युनिर्व्हस नीतू खोसला, क्रिकेटर जयदेव उनादकत, तसेच गिरिप्रेमी, निसर्गप्रेमी व हौशी पर्यटकांचा यामध्ये समावे असणार आहे.

पिठलं भाकरी, मिरचीचा ठेचा आणि बरंच काही
पारंपरिक पद्धतीने वॉकमध्ये सहभागी प्रत्येकाचे औक्षण तसेच ढोल ताश्यांच्या गजरात स्वागत, तसेच महाराष्ट्रातील विविध 22 किल्ल्यांच्या प्रतिकृती, भाजे लेणी परिसरात भिक्कू गुरुचे दर्शन, वासुदेव, पोतराज, जात्यावरची गाणी, भजन, किर्तन, पोवाडे, मर्दानी खेळ सोबत अस्सल मराठमोळी मिरचीचा ठेचा व भाखरी, मक्याचे कणीस, वडापाव, उकडलेले शेंगदाणे अशी मेजवाणी, तर समारोपाचे ठिकाण असलेल्या लोहगडाच्या पायथ्याला पिठलं भाकरी, भरीत वांगं व चुलीवरील रुचकर जेवण देण्यात येणार आहे.

अनाथ मुलांना मदत
या वॉकच्या माध्यमातून जमा होणारा निधी हा अनाथ मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी वापरला जाणार असल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले. भाजे लेणी ते लोहगड किल्ल्यादरम्यान वॉकची जय्यत तयारी सुरु असून, परिसरातील ग्रामस्त यामध्ये सहभागी होणार्‍या व्यक्तिंच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याची माहिती माजी सरपंच अशोक दळवी, कैलास शिर्के, गणेश धानीवले यांनी दिली.