हेलिकॉप्टरबाधा कायम; मुख्यमंत्री पुन्हा बचावले!

0

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हेलिकॉप्टरबाधा काही दूर होण्याचे नाव घेत नाही. गुरुवारी ते पुन्हा एकदा मोठ्या अपघातातून अगदी बालंबाल बचावले. भाईंदरमध्ये ते एका उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ही घटना घडली. एका शाळेच्या मैदानावर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरणार होते. हेलिकॉप्टर खाली येत असताना पायलटला लोंबकळणारी तार दिसली. त्यामुळे प्रसंगावधान राखून त्याने ते वर घेतले. ही केबल हेलिकॉप्टरच्या पंखांत अडकून मोठा अपघात होण्याची शक्यता होती. परंतु, सुदैवाने हा अपघात टळला. विशेष बाब म्हणजे, या हेलिकॉप्टरमध्ये फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील होते. कामात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवून ग्राउंड इंजिनिअरला निलंबित करण्यात आले असून, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहितीही वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली. मुख्यमंत्री कार्यालयाच्यावतीने मात्र याबाबत अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नव्हती. धक्कादायक बाब अशी, एक नव्हे तर तब्बल चौथ्यांदा मुख्यमंत्री फडणवीस हे अशाप्रकारच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेतून सहिसलामत वाचलेले आहेत.

परतीचा प्रवास हेलिकॉप्टरऐवजी वाहनाने!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी दुपारी एक वाजता भाईंदरमध्ये वर्सोवा येथील पुलाचे भूमिपूजन व इतर विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आले होते. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीदेखील उपस्थिती होती. या दोघांचे हेलिकॉप्टर भाईंदर येथील सेव्हन इल्वेन शाळेच्या मैदानावर उतरणार होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास हे हेलिकॉप्टर मैदानावर आले, पायलट ते खाली घेत असताना त्याला अचानक केबल वायर दिसली. ही केबल हेलिकॉप्टरच्या पंख्यांत अडकून भीषण दुर्घटना घडण्याची शक्यता होती. त्यामुळे वेळीच धोका ओळखून पायलटने ते तातडीने वर घेतले. थोडे पुढे नेऊन दुसर्‍या एका सुरक्षित जागेवर हे हेलिकॉप्टर उतरविण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह गडकरी यांच्या जीवावरील मोठे संकट टळू शकले. त्यानंतर फडणवीस व गडकरी यांनी घोडबंदर येथील वर्सोवा पुलाचे भूमिपूजन व इतर भूमिपूजन उरकून हेलिकॉप्टरऐवजी वाहनाद्वारेच मुंबईला परत जाणे सोयीस्कर मानले. अशाप्रकारे अपघातातून वाचण्याची मुख्यमंत्र्यांची ही चौथी घटना असली तरी, अशी काही घटना घडली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नाकारले आहे. तसेच, सीएमओनेदेखील प्रसारमाध्यमांना अधिकृत माहिती दिली नव्हती.

मुख्यमंत्र्यांची हेलिकॉप्टरबाधा…
– 25/05/2017 : लातूर येथे टेक ऑफ घेताच हेलिकॉप्टर कोसळले
– 07/07/2017 : अलिबाग येथे हेलिकॉप्टरचे पाते डोक्याला लागता लागता वाचले
– 09/12/2017 : नाशिक येथे क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याने हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅण्डिंग
– 11/01/2018 : मार्गात केबल आल्याने हेलिकॉप्टरचे तातडीने टेक ऑफ, दुर्घटना टळली

मुख्यमंत्री सूत्र म्हणते; केबल नाही तांत्रिक अडचण!
मीरा भाईंदरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला कोणताही अपघात झालेला नाही. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील, आशीष शेलार आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे हे पाच लोक हेलिकॉप्टरने मुंबईकडे जाणार होते. पण टेक ऑफसाठी जागा कमी होती. हेलिकॉप्टर स्लोपमध्ये न उडवता सरळ वर उचलावे लागणार होते. त्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये वजन कमी असावे, असा सल्ला पायलटने दिला. आम्ही फक्त दोन माणसे घेऊन उडू शकतो असे पायलटने सांगितले. पण फक्त दोनच माणसे जाऊ शकणार असतील तर हेलिकॉप्टरऐवजी बायरोड मुंबईला जाऊ असा निर्णय घेण्यात आला. आणि मुख्यमंत्री बायरोड मुंबईकडे निघाले. हेलिकॉप्टरच्या टेक ऑफ साईटची अडचण होती. बाकी कोणतीही केबल किंवा काही मध्ये आली नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या प्रशासकीय सूत्राने दिली आहे.