‘अमृता’कडून रुग्णांचा तपशील घ्या, ‘स्थायी’ची सूचना
पिंपरी-चिंचवड: महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयासह इतर रुग्णालयांत हेल्थ कार्ड मॅनेजमेंट सिस्टिम राबविण्यात येत आहे. या यंत्रणेचा दुरुस्ती व देखभालीचे काम अमृता टेक्नॉलॉजीला थेट पद्धतीने पुन्हा पाच वर्षे देण्यास स्थायी समितीने नकार दिला. केवळ तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. तसेच ‘अमृता’कडे असलेल्या तब्बल पाच लाख 84 हजार रुग्णांचा तपशील महापालिकेच्या ताब्यात घेण्याची सूचना समितीने प्रशासनाला दिली.
डाटा ताब्यात घ्यावा
नागरिकांना उपचार घेण्यासाठी हेल्थ कार्ड ही ऑनलाईन योजना अमृता टेक्नॉलॉजीने कार्यान्वित केली आहे. ‘वायसीएम’सह इतर सात रुग्णालये व 16 बाह्यरुग्ण विभागांमध्ये हेल्थ कार्ड मॅनेजमेंट सिस्टिम राबविण्यात येते. अमृताच्या कामाची मुदत 14 ऑक्टोबर 2017 ला संपली आहे. त्याच संस्थेला पुढील पाच वर्षे कालावधीकरिता देखभाल-दुरुस्तीसाठी ठेका देण्याचा पाच कोटी 43 लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव समितीसमोर होता. हा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळून लावला. संबंधित संस्थेची ही प्रणाली आहे. सर्व्हर, सॉफ्टवेअर, पेटंट त्यांच्याकडे आहे. त्यांचे कर्मचारी नसल्यास ती यंत्रणा राबविता येत आहे. संस्थेने आतापर्यंत प्रत्येकी 20 रुपयांप्रमाणे पाच लाख 84 हेल्थ कार्ड तयार केली आहेत. संबंधित संस्थेशिवाय सदर काम इतरांना करता येत नाही. त्यांच्याकडील असलेल्या रुग्णांचा तपशिलाचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे हा तपशील महापालिकेच्या ‘आयटी’ विभागाने स्वत:च्या ताब्यात घेऊन ही यंत्रणा उभी करावी. कमी दरात दुसरी कोणती संस्था काम करण्यात तयार आहे, का हे तपासावे, अशा सूचना समितीने प्रशासनाला दिल्या.