पुणे – पुणेकरांवर हेल्मेटसक्ती करण्याला काँग्रेस पक्षाचा विरोध असून या नावाखाली चाललेली दंडात्मक कारवाई ताबडतोब थांबवावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे.
हेल्मेट ऐच्छिक असावे, सक्ती नको अशी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र, महामार्गावर हेल्मेट सक्तीला काँग्रेसचा पाठिंबा आहे. शहरात मात्र हेल्मेट सक्ती करण्यास काँग्रेसचा विरोध आहे. शहरात अनेक भागात वीस किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे अशक्य असते. वेगात गाड्या चालविण्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण कमी आहे. त्या चुकीच्या पद्धतीने चालविल्या जातात आणि अपघात होतात. अशा चुकीच्या पद्धतीने गाडी चालविणाऱ्यांवर पोलीसांनी निर्बंध घातले पाहिजेत हे ही काँग्रेसला मान्य आहे. हेल्मेट बाबत जनजागृती करावी, हेल्मेट ऐच्छिक असावे, त्याची सक्ती नसावी असे बागवे यांनी निवेदनात म्हटले आहे.
शहरात वाहतूक पोलीसांची संख्या कमी आहे असे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु चौकाचौकात पाच-पाच, दहा-दहा पोलीस घोळक्याने थांबलेले दिसतात. पोलीसांच्या वाहतूक खात्याने त्यांच्याकडील मनुष्यबळाचे नियोजन करणे आवश्यक असून त्याकडे पोलीस आयुक्तांनी लक्ष द्यायला हवे. अशी सूचना बागवे यांनी केली आहे.