हेल्मेट सक्तीचे केल्याने हेल्मेट विक्रीत वाढ

0

जळगाव सपना पवार । राज्य व राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची घटना नेहमीच घडत असते. राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताने आजपर्यत अनेक निष्पापाना अपघातात जीव गमवावा लागला आहे. यात हेल्मेट नसल्याने मृत्यु होणार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेकरीता जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे विशेष पाऊल उचलण्यात आले असून 17 फेबु्रवारी पासुन राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गावर प्रवास करणार्‍या वाहन धारकांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. हेल्मेट नसणार्‍यांवर पोलीस दलातर्फे दंडात्मक कारवाई सुरु आहे.

सर्वांनाच हेल्मेट सक्तीचे व अनिवार्य करण्यात आले असल्याने हेल्मेटच्या विक्रीत वाढ झाली आहे. मागील दोन आठवड्यात हेल्मेटच्या विक्रीत 30-35 टक्के वाढ झाली असल्याची माहिती हेल्मेट विक्रेत्यानी दिली आहे. बाजारात आयएसआय मानांकीत हेल्मेट विक्रीसाठी दाखल झाले असुन ग्राहकांकडून त्यांची मागणी अधिक आहे. आयएसआय मानांकीत हेल्मेटची किंमत एक हजार ते अठराशे रुपयांपर्यत आहे. तर साधारण हेल्मेट दोनशे ते चारशे रुपयांपर्यत उपलब्ध आहे. हेल्मेट सक्तीचे करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर देखील हेल्मेट विक्रीचे स्टॉल लावण्यात आले असल्याचे दिसून येते. तसेच उन्हाचे चटके लागण्यास सुरुवात झाल्याने हेल्मेटची मागणी अधिक असल्याचे दिसते.

आयएसआयच्या नावावर नकली हेल्मेट विक्री
नागरी सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्मेटचा वापर अनिवार्य व सक्तीचे करण्यात आल्यानंतर हेल्मेटची मागणी वाढली आहे. सध्या राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गावर हेल्मेट विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले आहे. आयएसआय हेल्मेटचा वापर चांगले असल्याने वाहनधारंकाकडून त्यांची अधिक मागणी आहे. आयएसआय नामांकीत हेल्मेटला अधिक मागणी असल्याने नकली आयएसआय मार्कचे हेल्मेट बाजारात दाखल झाले आहे. तसेच रस्त्यावर याची विक्री सर्रास पणे होतांना दिसत आहे. रस्त्यावर दिवसभरातून दहा ते पंधरा हेल्मेट विक्री होत असते.