पुणे : दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्याच्या पोलिस आयुक्तांच्या कारवाईविरोधात सर्वपक्षीय नेते, स्वयंसेवी संघटनांचे प्रमुख उतरल्याने विरोधाची ताकद वाढत चालली आहे. सत्ताधारी शिवसेनेचे शहरप्रमुख महादेव बाबरही यात उतरले आहेत.
हेल्मेट सक्तीच्या पोलीस खात्याच्या कारवाईला सत्ताधारी पक्षातूनच विरोध होऊ लागला आहे. भाजपचे खासदार यांनीही सक्तीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. हेल्मेट वापराने मान आणि कंबरदुखी असणार्यांना त्रास होतो याचा विचार करायला हवा, सक्ती न करता हेल्मेट ऐच्छिक ठेवावे, असे प्रांजळ मत असल्याचे शिरोळे म्हणाले. आता शिरोळे यांच्या पाठोपाठ सत्ताधारी शिवसेनेचे महादेव बाबर सक्तीविरोधी आंदोलनात सहभागी आहेत. बाबर यांच्या नेतृत्वाखाली कोंढव्यामध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. शिवसेनेने हेल्मेटची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.
हेल्मेट सक्तीच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तीन पक्ष उतरले आहेत. खासदारांनीही विरोधात मत व्यक्त केले आहे. या सर्वांना न जुमानता पोलिस खात्याने दंडात्मक कारवाई सुरूच ठेवली आहे. पोलिस कारवाईच्या निषेधात माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, माजी महापौर अंकुश काकडे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, मनसेच्या रुपाली पाटील, नगरसेवक विशाल धनावडे, माजी नगरसेवक शाम देशपांडे, धनंजय जाधव, भाजपचे पदाधिकारी संदीप खर्डेकर, ग्राहक चळवळीचे नेते सूर्यकांत पाठक, सजग नागरी मंचचे विवेक वेलणकर असे प्रमुख नेते, कार्यकर्ते हेल्मेट सक्तीविरोधात उतरले आहेत. हेल्मेट सक्तीला विरोध वाढतच जाईल अशी चिन्हे आहेत.