पुणे : हेल्मेट सक्ती कारवाईत सबुरी राखा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यावरही पोलिस खात्याने कारवाई चालू ठेवल्याने भाजप नेते नाराज झाले असून महापालिकेच्या मुख्य सभेत पोलीस खात्याच्या कारभारावर चर्चा घडवून आणण्याच्या तयारीत आहेत.
हेल्मेट विरोधी कृती समितीची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीला महापालिका सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते. पोलिस कारवाईच्या निषेधार्थ महापालिका सभेत तहकुबी मांडा अशा सूचना भिमाले यांच्याकडे करण्यात आल्या.भिमाले यांनाही त्यासाठी तयारी दाखविली. तहकुबी सूचनेवरील भाषणांत पोलिस खात्याचा पंचनामा केला जाईल अशी शक्यता आहे.
दुचाकीस्वारानेे हेल्मेट वापरावे पण त्याची सक्ती केली जावू नये अशी भूमिका भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांनी मांडली. गल्लीबोळात दंड आकारणीची कारवाई करू नका , असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनीही पत्रक काढून सक्ती आणि दंड आकारणीला विरोध केला. दरम्यान , मुख्यमंत्री फडणवीस यांची पुणे भेट झाली तेव्हा त्यांनी सबुरीने घ्या असा सूचक संदेश दिला. त्यानंतरही पोलीस खात्याने दुचाकीस्वारांना अडवून पाचशे रुपये दंड आकारणी चालू ठेवली आहे. या कारणाने भाजप नेते दुखावले आहेत. एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत चालले आहे आणि त्यात हेल्मेट सक्ती जनतेत असंतोष वाढविणारी आहे याची जाणीव भाजप नेत्यांना झाली आहे.
हे देखील वाचा