हेल्मेट सक्तीविरोधात पुणेकरांचा मोर्चा

0

पुणे- पुणे शहरात हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. दरम्यान हेल्मेट सक्तीविरोधात पुणेकर आणि हेल्मेट सक्ती विरोधी कृती समिती आक्रमक झाली असून निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. गांजवे चौक ते पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे.

या निषेध मोर्चात कृती समितीचे अध्यक्ष सुर्यकांत पाठक, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील तसेच विविध संघटनेचे लोकप्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

राज्यभरात न्यायालयाच्या निकालानुसार हेल्मेटसक्ती लागू आहेच. त्यामुळे पुण्यात ती लागू झाली आहे, असे नव्हे, तर त्या सक्तीची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. पोलीस प्रशासन हेल्मेट सक्तीबाबत ठाम असून गेल्या आठवडय़ापासूनच शहरात हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवरील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. तर, पोलीस आयुक्तांनी एकदा चारचाकीऐवजी दुचाकीवरून हेल्मेट घालून पुण्यात फिरावे, मगच हेल्मेट सक्तीचा निर्णय घ्यावा, अशी आग्रही भूमिका घेत हेल्मेट सक्तीविरोधी कृती समितीनेही आंदोलन सुरू केले आहे.
त्या बरोबरच हेल्मेट खरेदीही शहरात जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत वाहतूक शाखेकडून हेल्मेट परिधान न करणाऱ्या वीस हजार दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कारवाईबरोबर हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांच्या शोधासाठी पोलिसांकडून शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापरही करण्यात येत आहे.