हे कसले गांधी हो!

0

थोरगांधीवादी म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा शरद पवार यांच्याविरुद्ध आघाडी उघडली आहे. अख्खा देश जातीवाद, नोटाबंदी आणि इतर समस्यांनी ग्रस्त असताना अण्णांनी त्याकडे कानाडोळा करून पवारविरोधाचे शस्त्र उपसलेे. गांधीवादात व्यक्तीद्वेषाला स्थान नाही, तरीही अण्णा हे वारंवार पवारांचा द्वेष करतात, त्यामुळे अण्णा हे कसले गांधी? असा प्रश्‍न पडतो. सहकारी साखर कारखानदारीत पवारांनी 25 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप अण्णांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयाचे दारही ठोठावले आहे. त्याबद्दल न्यायालयाने अण्णांना फटकारले असले तरी त्यांच्या या कृतीतून केवळ अन् केवळ पवारद्वेष तेवढा दिसतो. शिवाय, नागपुरातील रेशीमबागेत बसलेला त्यांचा बोलविता धनीही उघड होतो!

जेथे शरद पवार यांना विरोधाचा प्रश्‍न येतो, तेथे अण्णा हजारे हे कधी कधी आपण देशवासीयांनी गौरवलेले ‘प्रतिगांधी’ आहोत हेच विसरून जातात. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मनात कोणत्याही व्यक्तीबद्दल कधीच द्वेष नव्हता. परंतु, आज ज्यांना प्रतिगांधी म्हणून ओळखले जाते, त्या अण्णा हजारेंना मात्र शरद पवार यांच्याविषयी कमालीचा द्वेष आहे. कालौघात शत्रुचे मित्र होत असतात, परंतु अनेक दशकानंतरही पवारांशी वैचारिक आणि सगळ्याच प्रकारचे शत्रूत्व अण्णांनी जोपासले आहे, त्यात प्रत्येकवेळी ते तोंडघशीही पडले आहेत. राजधानी नवी दिल्लीत एका माथेफिरू तरुणाने जेव्हा पवारांना थप्पड मारली होती, तेव्हा याच प्रतिगांधीनी ‘एक ही थप्पड’ अशी अहिंसक प्रतिक्रिया दूरचित्रवाणी वाहिन्यांसमोर अगदी सहजपणे दिली होती. खरे तर त्याचवेळी त्यांनी गांधीवादाचे अंगावर चढवलेले कातडे गळून पडले होते अन् अण्णांचे खरे रुप उघडे झाले होते. अण्णांच्या एका आंदोलनात शेतकर्‍यांवर गोळीबार झाला होता. हा गोळीबार तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या इशार्‍यावरून झाला, असा अण्णांचा समज आहे, आणि तेव्हापासून ते पवारांच्या अगदी हात धुवून मागे लागले आहेत. परंतु, पवार हेदेखील तेल लावलेले पैलवान आहे, ते अद्यापही अण्णांच्या हाती लागू शकले नाहीत. काल-परवादेखील अण्णांनी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांतील घोटाळ्यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करून, या घोटाळ्यांचा आरोप शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे. त्यासाठी अण्णांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. परंतु, उच्च न्यायालयाला अण्णांचा हेतू कळला असावा.

शरद पवार जेव्हा नोटाबंदीच्या मुद्द्यावरून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेत आहेत, टीकेची झोड उठवत आहेत, त्याचवेळी अण्णांनी या आरोपांच्या फैरी झाडणार्‍या याचिका दाखल कराव्यात त्यामागे निश्‍चितच काही तरी काळेबेरे दिसते. अण्णांचा बोलविता धनी दुसराच कुणी तरी असून, तो नागपुरातील रेशीमबागेत बसलेला असावा, असे आता प्रत्येकाला वाटू लागले आहे. अण्णांच्या याचिकेत कारखान्यांच्या खासगीकरणावर आक्षेप घेण्यात आला होता. शिवाय, कमी किमतीत कारखाने विकल्याचा आरोपही करण्यात आला होता. एकंदरित 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप अण्णांनी केला असून, शरद पवार व अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांच्या चौकशीची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे अन् ही चौकशी केंद्र सरकारच्या अख्त्यारीतील सीबीआयमार्फत करण्याचा आग्रहदेखील त्यांनी धरलेला आहे. परंतु, न्यायालय कुणाच्या विनंतीवर आणि आग्रहावर काम करत नसते. मग् ते अण्णा हजारे असोत की आणखी कुणी! सहकारी कारखान्यांबाबत आधी तक्रार दाखल करा मग् चौकशीच्या आदेशाचे पाहू, असे सांगून न्यायालयाने अण्णांची विनंती तूर्तास फेटाळली. ही एक प्रकारे अण्णांना बसलेली चपराकच म्हणावी लागेल. अण्णा, त्यांची आंदोलने आणि त्यांचा शरद पवार विरोध हा विषय तसा स्वतंत्रपणे अभ्यास आणि भूमिका मांडण्याचा विषय आहे. अण्णा हजारे हे प्रचंड आत्मकेंद्री व्यक्तिमत्त्व असून, ते लोकशाहीची भलावण करत असले तरी त्यांचा लोकशाही पद्धतीवर फारसा विश्‍वास कधीच राहिलेला नाही. त्यामुळेच अनेक चांगले सहकारी त्यांना विविध चळवळीत लाभले अन् नंतर या सहकार्‍यांनी त्यांची उद्विग्न होऊन साथ सोडली. माहितीच्या अधिकाराचा लढा वगळता अण्णांची बरीचशी आंदालने व्यक्तीकेंद्रितच होती. त्यांचा हेतू भले तसा नव्हता, मात्र आंदोलनागणिक हेच स्वरूप येत गेल्याने त्यात अनेकांनी आपली पोळीही भाजून घेतली. अगदी सुरुवातीच्या सामाजिक वनीकरणविरोधी मोहिमेत विधानसभेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे त्यांच्यासमवेत होते.

राज व उद्धव ठाकरे हेसुद्धा त्यावेळी राळेगणसिद्धीला येऊन गेले. पुढे युतीच्या मंत्र्यांच्या विरोधात अण्णांनी आंदोलन केले, त्यावेळी या सर्वांचीच भूमिका बदललेली होती. विशेषत: सरकारचे उपप्रमुख म्हणून मुंडेंवर अण्णांची समजूत काढण्याची वेळ आली. अण्णांच्या गोटातही सातत्याने बदल होत गेले. उद्योगपती नवलमलजी फिरोदिया यांनी त्या काळात अण्णांना चांगली साथ केली. ज्येष्ठ गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे हेही त्यात सहभागी झाले. पुण्यातील प्रा. ग. प्र. प्रधान, मोहन धारिया अशी मंडळी त्यांच्यासमवेत होती. कालांतराने मात्र ते बाजूला झाले. ही मोठी माणसे का बाजूला गेलीत हा प्रश्न अनुत्तरितच आहे. अण्णांचे आत्मकेंद्रित निर्णय आणि अन्य कारणे काहीही असतील, पण प्रश्नांवर झालेली धरसोड बहुदा त्याला कारणीभूत असावी. समोरच्याने एखादी गोष्ट सांगितली की अण्णा त्यावर पटकन विश्वास ठेवतात. त्याचाही अनेकांनी गैरफायदा घेतला. यात राज्यकर्त्यांचाही समावेश आहे. याच भाबडेपणाचा फायदा घेऊन अण्णांची वारंवार आश्वासनांवर बोळवण करणे राज्यकर्त्यांना शक्य झाले असावे. मात्र लोकांना अण्णांचे असले वागणे कधीच रुचले नाही. आतादेखील साखर कारखाने घोटाळ्यांबाबत कुणीतरी अण्णांचे कान भरलेले दिसतात. त्यात श्रीगोंद्यातील एक माजी मंत्री आघाडीवर असल्याचेही बोलले जात आहे. या माजी मंत्र्याला शरद पवार यांनीच राजकारणातून संपवले, त्याच्या कारखान्याने अद्यापही शेतकर्‍यांना ऊसाचे पेमेंट केलेले नाही. या माजी मंत्र्यांसह रेशीमबागेतून अण्णांना कळसुत्री बाहुलीसारखे वापरले जात असल्याचा अनेकांना संशय असून, हा संशय कितपत खरा हादेखील संशोधनाचा विषय आहे. कमालीचा हेकेखोरपणा आणि आत्मकेंद्रीत व्यक्तिमत्त्व हे अण्णांच्या स्वभावातील मोठे दोष असून, त्याचा वारंवार अनेकजण गैरफायदा घेत असतात. त्यात पवारविरोध हा अण्णांचा कमकुवत दुवा असल्याने आता पवारांविरोधात अण्णांना पेटविण्याचे काम हेतुपुरस्सर होत असल्याचे प्रकर्षाने जाणवते आहे. मध्यंतरीच्या काळात अशा बर्‍याच गोष्टींचा अण्णांच्या चळवळींवर विपरीत परिणाम झाला. बरोबरचे धुरीणच नाही तर कार्यकर्तेही या चळवळीपासून दूर गेले होते. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या नगर जिल्ह्यांतर्गत तक्रार निवारण केंद्राकडे 1988 च्या सुमारास नेवासे तालुक्यातील सामाजिक वनीकरणाच्या कामातील भ्रष्टाचाराची तक्रार दाखल झाली होती. त्याची खातरजमा करताना या भ्रष्टाचाराची राज्यातील व्याप्ती लक्षात आली. त्यातूनच पुढे महाघोटाळा उघडकीस आला.

अण्णांनी त्याचा केलेला पाठपुरावा एवढा प्रभावी होता की, या विभागाचे 16 जिल्ह्यांचे प्रमुख अधिकारी कारवाईच्या फेर्‍यात अडकले. अण्णांनी सुरुवातीला चौकशी व्हावी यासाठी प्रियदर्शिनी इंदिरा वृक्षमित्र पुरस्कार व नंतर कारवाईसाठी पद्मश्री किताब पणाला लावला होता. प्रियदर्शिनी इंदिरा वृक्षमित्र पुरस्कार त्यांनी केंद्र सरकारला परतही केला. याच आंदोलनात त्यांचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याशी वितुष्ट आले ते आजतागायत टिकून आहे. ही 1994 सालची घटना आहे. काँग्रेसचे तत्कालीन राज्य सरकार पुढे पायउतार झाले, त्याची पायाभरणी या आंदोलनात झाली. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या मोहिमेला शेवटच्या टप्प्यात हजारेविरुद्ध शरद पवार असेच स्वरूप आले. त्या वेळी पवार यांनी काढलेले उद्गार नगर जिल्ह्यात अनेकांच्या अजूनही स्मरणात आहेत. ‘काहींच्या समाजकारणाला आता राजकारणाचा दर्प येऊ लागला आहे’ अशी प्रतिक्रिया पवारांनी त्यावेळी व्यक्त केली होती. त्यानंतर मात्र पवार यांनी नेहमीच अण्णांसाठी अनुल्लेखाचे शस्त्र वापरले. ही कटुता आजही दुर्दैवाने टिकून आहे. आतादेखील साखर कारखान्यांच्या कथित घोटाळ्यांच्या आरोपांना या कटुतेचाच वास येत आहे. अण्णा हजारेंनी पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करावेत, आणि पवारांनी त्याकडे दुर्लक्ष करावे असे आजपर्यंत चालत आले होते. परंतु, अण्णांच्या आरोपांना यापुढे सहन केले जाणार नाही, असे सांगून अण्णांविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा पवारांनी दिला आहे. नजीकच्या काळात पवारविरुद्ध हजारे असा संघर्षही पहायला मिळेल. किंबहुना सत्ताधारीवर्ग अन् रेशीमबागेचीही तिच इच्छा दिसते. माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या कागदपत्रांच्या आधारावर पवारांविरुद्धची न्यायालयीन लढाई अण्णांसाठी नक्कीच सोपी नाही, याचिकेच्या पहिल्या टप्प्यातच अण्णा तोंडघशी पडले. पुढील लढाईत ते कितपत टिकाव धरतील ही शंका आहेच. गांधीवाद हा जर अण्णांच्या कार्याचा आणि चळवळीचा प्राण असेल तर या गांधीवादात द्वेष आणि मत्सराला काहीच स्थान नाही. पवारांबद्दल अण्णा आणखी किती काळ द्वेषबुद्धी ठेवून वागणार आहेत? त्यामुळे तुम्ही खरे गांधी नाहीत, हेच आम्हाला अण्णांना सांगावेसे वाटते!!

– पुरुषोत्तम सांगळे

निवासी संपादक,
‘जनशक्ति’, पिंपरी-चिंचवड
8087861982