मुक्ताईनगर : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची कन्या अॅड.रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे हे प्रचंड संतप्त झाले असून त्यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा टिकेचे बाण चालवले आहेत. हे कसले शिवसैनिक? असा उल्लेख करून ते म्हणाले की, हा अपक्ष आमदार असून शरद पवार यांच्या आशीर्वार्दामुळे अॅड.रवींद्र भैय्यांच्या त्यागामुळे तो निवडून आल्याचे ते मुक्ताईनगरात म्हणाले.
हल्ला करणारे लोक गुंड प्रवृत्तीचे
खडसे म्हणाले की, मी ‘दोन दिवसांपूर्वी मी ऑडिओ क्लिप जारी केल्या होत्या. त्यातील लोक आणि हल्ला करणारे हे एकच असून हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांची चौकशी झाली पाहिजे व त्यांच्यावर कठोर कारवाई होऊन शिक्षा झाली पाहिजे. ‘महिलांवरील अन्याय कदापी सहन करणार नाही. मी रोहिणीच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असेही त्यांनी सांगत अॅड.रोहिणी खडसे यांच्यावर झालेला हल्ला, विनयभंगाच्या घटना व मुक्ताईनगरातील अवैध धंदे या प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.
हा कसला आमदार?
चंद्रकांत पाटील यांच्याविषयी बोलताना खडसे म्हणाले, हा कसला शिवसेनेचा आमदार? राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी त्याग केला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी रात्रं-दिवस मेहनत केली त्यामुळे चंद्रकांत पाटील आमदार झाला आणि हा स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घेतो. चंद्रकांत पाटील निवडून आले, त्यावेळी भाजप सेनेची युती होती. या युतीशीही चंद्रकांत पाटलांनी गद्दारी केली आणि निवडून आले. आता राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना छळत आहेत, असेही खडसे म्हणाले.
अवैध धंदे यांचेच
मुक्ताईनगर तालुक्यात अवैध धंदे यांचेच असून त्याबाबत आम्ही निवेदन दिले आहे. आरटीओ चेक पोस्टवर दररोज लाखोंची हेराफेरी सुरू असून या संदर्भात आपण वरीष्ठ स्तरावर तक्रार केल्याचे खडसे म्हणाले.