हे तर फसवणूक करणारे सरकार

0

मुंबई – मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले कर्जमाफीचे आकडे चुकीचे आहेत अशी कबुली राज्याच्या सहकारमंत्र्यांनीच दिली आहे. मुंबईत शेती होते आणि शेतकरी आहेत असा महान शोध राज्य सरकारने लावला आहे. यावरून राज्यात फडणवीस नाही तर फसवणूक करणारे सरकार आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत केली.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत वर्धा जिल्ह्याचे नावच नाही. पण, मुंबईत मात्र 813 शेतकरी असल्याचा शोध सरकारने लावला आहे. मुंबईत शहरात नेमकी कुठे शेती होते, याची माहिती सरकारने जाहीर करावी असे ते म्हणाले. सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांचे आकडे 2008 ते मार्च 2017 पर्यंतचे दाखवले. पण, कर्जमाफी मात्र फक्त एप्रिल 2012 ते 30 जून 2016 या चार वर्षांसाठी केली आहे. राज्य बँकिंग समितीच्या अहवालानुसार बुलडाण्यामध्येही एकूण कर्जधारक शेतकऱ्यांची संख्या दोन लाख 35 हजार 839 असताना केवळ दीड लाखांपेक्षा कमी कर्ज असलेले शेतकरी दोन लाख 49 हजार 818 आहेत असे मुख्यमंत्री म्हणतात. एकूण कर्जदार शेतकऱ्यांपेक्षा मुख्यमंत्र्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांची दिलेली संख्या जास्त आहे त्यावरून मुख्यमंत्र्यांनी दिलेले आकडे असत्य आहेत हे स्पष्ट होते, असेही त्यांनी सांगितले.

सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी 34 हजार कोटींची नाही तर फक्त पाच हजार कोटींची आहे. तसेच 89 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नसून केवळ 15 लाख शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आहे. हे राज्यस्तरीय बँकींग कमिटीने सरकारला दिलेले आकडेवारीवरून दिसून येते. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी 10 हजारांची उचल देण्याच्या निर्णयाचा सरकारने मोठा गाजावाजा केला होता. 12 जूनपासून या रकमेचे वाटप सुरू होईल, अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र आतापर्यंत तीन आठवड्यात राज्यभरातील एक कोटी 36 लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी फक्त 1082 शेतकऱ्यांनाच 10 हजाराची उचल मिळाली आहे, असे चव्हाण म्हणाले.

संपूर्ण सरसकट कर्जमाफीची काँग्रेस पक्षाची मागणी कायम आहे. सोमवारी 10 जुलै रोजी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक होणार असून या बैठकीत कर्जमाफीची वस्तुस्थिती जनतेपर्यंत नेण्यासाठी रणनिती ठरवली जाणार असून त्यानंतर राज्यस्तरीय आंदोलनाची आखणी केली जाईल असेही त्यांनी सांगितले.