हे तर ‘वेस्ट ऑफ वोट’ अशी मतदारांची भावना!

0

काँग्रेस अध्यक्ष सचिन साठे यांची टीका

पिंपरी : केंद्रात व राज्यात भाजप-सेनेचे सरकार येऊन चार वर्षे झाली. तर पिंपरी-चिंचवडमध्ये एक वर्ष झाले. एक वर्षापूर्वी भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर आरोप करणारे भाजप-सेनेच्या पदाधिकार्‍यांनी नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक केली आहे. बहुमताच्या जोरावर ‘वेस्ट टू एनर्जी’ सारखी कोट्यवधी रुपयांची भ्रष्टाचाराची कामे मंजूर करून घेतली. त्यामुळे मतदारांमध्ये ‘वेस्ट ऑफ वोट’ची भावना निर्माण झाली आहे, अशी टीका पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली.

शहरातील समस्या तशाच
साठे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड मनपामध्ये भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांवरून शिवसेना भाजपमध्ये सुरु असणारा ‘कलगीतुरा’ म्हणजे ‘वेस्ट ऑफ वोट’ अशी मतदारांची भावना झाली आहे. शिवसेना मनपामध्ये विरोध केल्याचे चित्र निर्माण करते व प्रत्येक वेळी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देते, करत मात्र काही नाही. शहरातील नागरिकांना भेडसावणार्‍या शास्तीकराच्या समस्या, अनधिकृत बांधकाम, रेड झोन, बीआरटी, मुबलक पाणीपुरवठा या समस्या अद्याप सुटल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक मतदारांसह देशभरातील मतदारांमध्ये आता ‘वेस्ट ऑफ वोट’ ची भावना निर्माण झाली आहे.