राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार खाली खेचण्यासाठी शिवसेनेला हरएक प्रकारे डिवचण्याचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पाठिंबा काढण्याची धमकी देतात खरी. परंतु, ते खरेच पाठिंबा काढतील की नाही? याबाबत राज्यातील प्रत्येकजण साशंक आहे. काल-परवाच्या वक्तव्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीदेखील हे सरकार पाडण्यासाठी हातभार लावू, असे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे सरकारला शिवसेनेने लावलेला टेकू अधांतरी आहे, असे प्रकर्षाने जाणवत असले तरी हे राज्य जावे, असे ‘जाणत्या राजा’ला का वाटते? यावर मंथन व्हायला हवे!
राज्यात सत्तेवर असलेले भारतीय जनता पक्षाचे सरकारही ज्यांना आपण जाणते राजे असे म्हणतो त्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी डोकेदुखी नाही! त्यांची डोकेदुखी आहे ती मुख्यमंत्रीपदी बसलेले देवेंद्र फडणवीस! आता हे राज्य सरकार पडावे असे पवारांना वाटत असेल तर त्यामागे फडणवीस हेच मोठे कारण आहे. मुळात फडणवीस यांच्या रूपाने या पुरोगामी राज्याला दुसर्यांदा ब्राह्मण मुख्यमंत्री लाभला, ही बाब पवारांसह कुणालाच पचनी पडलेली नाही. यापूर्वी ब्राह्मण मुख्यमंत्री देण्याची चूक शिवसेनेने केली होती, त्याचे परिणाम असे झाले की अद्याप शिवसेना सत्तेवर येऊ शकली नाही. शिवसेनेचा अस्त आणि भाजपचा उदय या घडामोडीमागे कुठेतरी त्याकाळी शिवसेनाप्रमुखांनी केलेली चूक कारणीभूत आहे. आतादेखील राज्यात जेव्हा नरेंद्र मोदींचे वारे जोरात होते. तेव्हा मुख्यमंत्री म्हणून भाजपकडून सुरुवातीला स्व. गोपीनाथ मुंडे, त्यांच्या निधनानंतर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांचे नाव पुढे केले गेले. देवेंद्र फडणवीस यांचे नाव कुठेच नसताना नागपुरी चाणक्यांनी अचानक त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसवले. बरे, या फडणवीसांनी सत्ताशकट हाकताना पवारांना न दुखवण्याची जाणती भूमिका घ्यायला हवी होती. परंतु, त्यांनी तसे न करता सरळ पवारांवर शिंगे रोखली. काही प्रसंगी तर सरळ पवारांना शिंगावर घेतले.
अजित पवारांना तुरुंगात टाकू, सुनील तटकरेंना तुरुंगात टाकू, राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टवादी पक्ष, अशा नानाविध आरोपांची नुसती राळ उठवून फडणवीस हे पवारांच्या अंगावर चालून गेले. छगन भुजबळांना तुरुंगात टाकून पवारांना ढुसकणीदेखील मारली. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला, फडणवीस हे पवारांच्या डोक्यात बसले. सहकारी संस्थांतून राष्ट्रवादीला हद्दपार करण्याची रणनीती, सहकारी बँकांना घातलेली वेसण अशा या ना त्या कारणातून फडणवीसांनी पवारांना शिंगावर घेतले. मुळात या राज्यातील एक राजकीय गंमत अशी आहे, की सगळेच पक्ष पवार हे चालवत असतात. शिवसेना अन् भाजपमध्ये आता जे काही बिनसले आहे, त्याला कारणीभूत पवारच आहेत. त्यामुळे शिवसेनाच्या टेकूवर तरलेले भाजपचे सरकार कोसळवणे पवारांसाठी फारसे अवघड नाही. यापूर्वी शिवसेनेचा पाठिंबा नसतानाही हेच सरकार वाचवण्याचे काम पवारांच्या टेकूने विधिमंडळात केलेच होते. त्यामुळे आता हे राज्य जावे ही पवारांची इच्छा असेल तर फडणवीसांना कुणीही वाचवू शकत नाही, हे अगदी खरे आहे.
महापालिका निवडणूक निकालांच्या कौलावर फडणवीस सरकारचे भवितव्य अवलंबून असून, मुंबईत शिवसेना बहुमताने सत्तेवर यावी, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा शरद पवार आणि काँग्रेसचेच नेते जोमाने काम करत आहेत. कारण मुंबई शिवसेनेच्या ताब्यात गेली की ते फडणवीस सरकारचा पाठिंबा नक्की काढणार हे अगदी सत्य आहे आणि हे सत्य राजकारणातील सगळेच जाणून आहे. राहिला प्रश्न फडणवीसांचा! फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून खाली उतरवले तरी काहीअंशी पवारांची शांतता करता येऊ शकते, हे भाजपचे दिल्लीतील नेतृत्व जाणून आहेत. त्यामुळे उद्या सरकार पडण्याची वेळच आली तर भाजपचे वरिष्ठ नेतृत्व फडणवीसांचा प्यादा हलवून तेथे चंद्रकांतदादा पाटील यांची वर्णी लावण्याच्या तयारीत आहेत. अर्थात हा निवडणूक निकालानंतरचा खेळ असेल. परंतु, तूर्त तरी भाजपकडे प्लॅन बी तयार आहे, असे समजायला हरकत नाही. ‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा’ असे इतिहासप्रसिद्ध वाक्य आपण वारंवार ऐकत आलोच आहोत. परंतु, हे फडणवीसी राज्य जावो ही पवारांची इच्छा आहे, हे नवा इतिहास घडवणारे वाक्य या राज्यातील जनतेला आता पहिल्यांदाच ऐकायला मिळत असेल. पुढील राजकीय घडमोडींचे संकेत आता मिळतच आहेत, ते संकेत बेंबीच्या देठापासून भाषण ठोकणार्या फडणवीसांसाठी नक्कीच चांगले नाहीत!
राज्यात मध्यावधी निवडणुकांसाठी जोरदार वातावरण तापवले जात असले, तरी निवडणूक जिंकण्याची ती एक खेळी असू शकते, असेही राज्यात चर्चिले जात आहे. अर्थातच ही खेळी महाराष्ट्राचे सार्वजनिक काका यांच्याकडून खेळली जात आहे. राष्ट्रवादीला ठिकठिकाणी भगदाड पाडून फडणवीस यांनी राष्ट्रवादीचेच मोहरे राष्ट्रवादीविरुद्ध प्यादे केले आहेत. त्यामुळे हे सरकार पडले तर या प्याद्यांचे काय होईल? अशी भीती निर्माण करण्यात सार्वजनिक काका कमालीचे यशस्वी झाले आहेत. राजकारण हे अनिश्चिततेचा प्रांत असल्याचे बोलले जाते. फडणवीस सरकार पाडण्यासाठी राष्ट्रवादीचा हातभार लागत असेल, तर त्यात नवे काही नाही? सरकार पाडण्याचा अनुभव पवारांइतका अन्य कुणाला दांडगा नाही! परंतु, फडणवीसांना हटवून पवारांचे समाधान होत असेल तर तो पर्याय मात्र दिल्लीश्वरांना अधिक सोपा आणि सरळ वाटतो!