हे राम! न्यायालयाने स्वामींना फटकारले!

0

नवी दिल्ली/मुंबई : राममंदिर प्रकरणाची दररोज सुनावणी घ्यावी, ही भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या खटल्यात तुम्ही याचिकाकर्ते नाहीत. मग तुम्हाला या प्रकरणात एवढा रस का, असा सवाल करत दररोज या प्रकरणावर सुनावणी करण्यास आमच्याकडे वेळ नाही, अशा शब्दांत न्यायालयाने सुब्रमण्यम स्वामींना फटकारले. दोन्ही पक्षकरांनी परस्पर सहमतीने निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने निर्देश दिले होते. त्यानंतरही मागील सहा ते सात वर्षे या प्रकरणात काहीच हालचाल झाली नव्हती. त्यामुळे या प्रकरणाचा लवकर निकाल लागावा, यासाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

पक्षकार नसतानाही स्वामींची लुडबुड का?
अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न संवेदनशील आणि भावनिक असल्याचे सांगत, हा वाद सोडविण्यासाठी सर्व संबंधित पक्षांनी न्यायालयाबाहेर नव्याने प्रयत्न करावेत, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने 21 मार्चरोजी दिला होता. यासाठी एकत्र बसून चर्चा करा, प्रसंगी मध्यस्थाची नियुक्ती करा आणि त्यासाठी वाटल्यास आम्ही मदत करू, असेही न्यायालयाने सांगितले. तरही या प्रकरणात काहीच हालचाल झाली नव्हती. त्यामुळे या प्रकरणाचा लवकर निकाल लागावा यासाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, मुख्य याचिकाकर्ते हाशिम अन्सारी यांचा मुलगा इक्बाल अन्सारी यांनी सुब्रमण्यम स्वामी यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहिले होते. या प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी हे पक्षकार नाहीत. त्यांनी पक्षकारांना काहीच न सांगता सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण ठेवले आहे. त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे म्हटले होते. या प्रकरणाची सुनावणी करतानाही न्यायालयाने हाच सवाल सुब्रमण्यम स्वामींना विचारला व दररोज सुनावणी करण्यास नकार दिला.

राम मंदिर निर्मितीची गोड बातमी नक्कीच येईल : विहिंप
राम मंदिर निर्माणासाठी केंद्र सरकारने कायदा पारित करावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी केली. मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जैन म्हणाले की, संबंधित जागेवर राम मंदिर असल्याचे पुरावे समोर आले आहे. इलाहाबाद उच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने चर्चेचा मार्ग सुचविला होता. मात्र स्वतःला निधर्मवादी म्हणवणार्‍या काही मुस्लीम संघटनांनी चर्चेची दारे बंद ठेवली. त्यामुळे शेवटचा मार्ग म्हणून हिंदू समाजाने संकल्प करत देशात 5 हजार सभांद्वारे जनजागरण करणार आहे. सोबतच शोभायात्रा आणि ग्रामसभा घेतल्या जातील. त्यामधून निर्माण होणार्‍या वातावरणाला कोणतीही संघटना किंवा व्यक्ती विरोध करू शकणार नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र शासनाने पुढाकार घेऊन कायदेशीररित्या हा प्रश्न मार्गी लावावा. यावर्षी भव्य राम मंदिर निर्मातीची गोड बातमी नक्कीच समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.