मुंबई: राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र सरकारमध्ये मतभेद असून लवकरच हे सरकार पडेल असे बोलले जात आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपकडून सरकार पडण्याचा प्रयत्न सुरु असून सरकार पडेल यासाठी पैजा लावल्या जात असल्याचे आरोप केले होते. दरम्यान यावर माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. सरकारचे अपयश झाकण्यासाठी संजय राऊत एखादे विधानकरून लक्ष विचलित करण्याचे काम करत असल्याचा टोला लगावत हे सरकार पडण्याचा आम्ही कधीही प्रयत्न करणार नसल्याचे सांगितले.
सरकार पडण्याची आम्हाला कोणतीही घाई नसून सरकार त्यांच्यातील अंतर्गत मतभेदामुळेच पडेल असेही त्यांनी सांगितले.
सरकारमधील मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्यात मतभेद आहे, हे अनेकदा उघड झाले आहे. ठाकरे सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असून अविश्वास देखील दिसून येत आहे असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.