धुळे । कर भरणार्या नोकरदाराच्या, शेतकरी, शेतमजूरांच्या आणि सर्व सामान्य गरीबांच्या पैशांची उधळपट्टी करुन मोठ-मोठे ’इव्हेंट’ घेणारे हे सरकार आहे. कधी स्टार्टअप इंडिया तर कधी मॅग्नेटिक महाराष्ट्र, असे कार्यक्रम घेवून करोडो रुपयांच्या जाहीराती केल्या जात आहेत. परंतू, यातून किती गुंतवणूक झाली, किती तरुणांना रोजगार मिळाला, याची माहिती देण्यात हे सरकार असमर्थ ठरत आहे. हे सरकर नसून इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, असे टिकास्त्र राष्ट्रवादी काँगे्रसच्या खा.सुप्रिया सुळे यांनी भाजपा सरकारवर सोडले. तर येत्या अधिवेशनात शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकरणावर, मंत्री जयकुमार रावल यांच्या विविध प्रकरणांवर आणि महामार्गावरील जमीन संपादन आणि मोबदला लाटणार्या अधिकारी, दलालांच्याही विषयावर चर्चा घडवून आणणारच, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांनी केली.
कार्यक्रमात यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादी प्रदेशतर्फे राज्य शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी काढण्यात आलेली हल्लाबोल यात्रा आज धुळ्यात दाखल झाली. या निमीत्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत सुळे व तटकरे बोलत होते. शहरातील गुलमोहोर विश्रामगृह येथे आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पत्रकार परिषद झाली. यावेळी खा.सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादीचे प्रभारी रणजीतसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी कृषी सभापती किरण पाटील, प्रा.संदीपदादा बेडसे, रणजीतराजे भोसले आदी उपस्थित होते.