जळगाव: सरकारबाबत नेहमी एक शब्द वापरला जातो तो म्हणजे ‘मायबाप सरकार’. मात्र आताच्या सरकारला तो शब्द लागू पडत नाही. महाविकास आघाडीचे सरकार मायबाप सरकार नाही तर या सरकारचे मायबाप जनता आहे. जनतेच्या सेवेसाठी महाविकास आघाडीचे सरकार असल्याने जनताच मायबाप आहे असे विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. जळगाव येथे एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जनतेच्या कल्याणात कोठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही देखील यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिली.
आजच्या राजकारणात तरुण पिढीची आणि चांगल्या विचाराच्या लोकांची आवश्यकता असल्याने तरुणांनी राजकारणात यावे असे आवाहन त्यांनी केले. तुमच्या आवडत्या विचाराच्या पक्षाच्या माध्यमातून राजकारणात या आणि समाजाची सेवा करा, तरुणींनी देखील राजकारणाचा मार्ग धरावा असेही खासदार सुळे यांनी सांगितले.