हे सरकार यशवंतरावांच्या विचाराचे हा सर्वात मोठा विनोद!

0

कराड : यशवंतराव चव्हाण यांच्या 33व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी अनेक नेत्यांनी कराडमधील प्रीतिसंगमावर जाऊन यशवंतरावांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रीतिसंगमावर पुष्पचक्र वाहिले. राज्यातील सध्याचे सरकार यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. यशवंतरावांसारखे सुसंस्कृत राजकारण करत सर्वसामान्यांसाठी काम करण्याची प्रेरणा मी येथून नेत आहे. राज्यातील भाजप सरकार यशवंतरावांच्या विचारावरच चालले आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले होते. त्यांच्या या विधानाची खिल्ली उडवताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य हा या वर्षातील सर्वात मोठा विनोद आहे. दुसरीकडे, केंद्र आणि राज्य सरकार विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ’हल्लाबोल’ आंदोलनाला कराड येथून सुरुवात करण्यात आली. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थित या आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला.

यशवंतरावांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू : फडणवीस
स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राला आकार देण्याचे काम केले. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या यशवंतराव यांचा वारसा जपणारे हे सरकार असून लवकरच चव्हाण यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवू, असे आश्‍वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थानला भेट देऊन आदरांजली दिली, यावेळी ते बोलत होते.

हा मोठा विरोधाभास
शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री ज्या विचारधारेतून आले आहेत, त्या विचारधारेच्या जवळपाससुद्धा जाण्याचा विचार चव्हाण साहेबांनी उभ्या आयुष्यात कधी केला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हा मोठा विरोधाभास आहे. अर्थात, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते यशवंतरावांना अभिवादन करायला येतात, याचा आनंदच आहे. परंतु, चव्हाण साहेबांना अभिप्रेत अशा विचारांवर सध्याचे सरकार चालले आहे, हा त्यांनी केलेला या वर्षातला सर्वात मोठा विनोद आहे. यापेक्षा दुसरे काही म्हणता येणार नाही.

ठाकरे-पवार भेटीचा आणखी एक गौप्यस्फोट
उद्धव ठाकरे यांनी मागील पंधरवड्यात शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी गुप्त भेट घेतली होती. या गुप्त भेटीचा खुलासा खुद्द पवारांनीच मागील आठवड्यात केला होता. यामुळे उद्धव ठाकरे यांनी पवारांवर काल कोल्हापुरात टीका केली होती. भेटीची जाहीर वाच्यता करू नका असे सांगितलेले असतानाही पवारांनी त्याचा खुलासा केलाच, शांत राहतील ते पवार कसले? अशी खंत उद्धव ठाकरे यांनी केली होती. याबाबत पवारांनी कराडमध्ये आणखी एक गौप्यस्फोट केला. पवार म्हणाले, भाजपने नारायण राणेंना विधानपरिषदेची उमेदवारी दिली तर शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असेल. तसेच राणेंविरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येत अराजकीय उमेदवार द्यावा जेणेकरून कोणतेही अडचण निर्माण होणार नाही, असा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरे आले होते. मात्र, आम्ही काँग्रेससोबत राहणार असल्याचे त्यांना सांगितले. कारण ही जागा काँग्रेसची आहे, असे म्हणत पवार यांनी या भेटीसंबंधी आणखी एक गौप्यस्फोट केला. दरम्यान, या सर्व घडामोडीची कल्पना आल्यानेच नारायण राणेंनी विधानपरिषद निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेचा प्रयत्न अधाशासारखा..
यशवंतराव चव्हाणांच्या 33व्या पुण्यतिथीनिमित्त चव्हाणांच्या स्मृतीस्थळाचे अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण यांनीही दर्शन घेतले. यावेळी अजित पवार म्हणाले, शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. एकीकडे सत्तेत बसायचे, दुसरीकडे विरोध करायचा आणि लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा. पण जनता काही ऐवढी दूधखुळी नाही. जनतेला काही समजत नाही असे काही समजण्याचे अजिबात कारण नाही. महाराष्ट्रातील जनता प्रचंड हुशार आहे. आम्ही कसे वागतो, काय बोलतो याकडे अतिशय बारकाईने लक्ष देतात. त्यामुळे निवडणुकीत कुठे बटण दाबायचे तिथे ते बरोबर दाबतात. शिवसेनेला सत्तेची ऊबही हवी आहे आणि विरोधकांची स्पेसदेखील. सगळेच अधाशासारखे घेण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.