नवी दिल्ली :– दिल्ली डेअरडेव्हिल्सवर सनरायझर्स हैदराबादने ७ विकेट राखून विजय मिळवला. दिल्लीचे १६४ धावांचे लक्ष्य हैदराबादने ३ बळींच्या मोबदल्यात १९.५ षटकांत सहज पार केले. मात्र, दिल्लीचे स्पध्रेतील आव्हान धोक्यात आले आहे.
प्रथम फलंदाजी करीत दिल्लीने पृथ्वी शॉच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर २० षटकांत ५ बाद १६३ धावा केल्या. शॉने ३६ चेंडूंत ६५ धावांची खेळी करीत दिल्लीला पहिल्या दहा षटकांत ९५ धावा उभ्या करून दिल्या होत्या. मात्र, अखेरच्या दहा षटकांत त्यांना केवळ ६७ धावा जोडता आल्या. सलामीवीर ग्लेन मॅक्सवेल (२) दुसऱ्याच षटकात धावबाद झाला. त्यानंतर शॉ आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी दिल्लीला सावरले. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागिदारी केली. अय्यरने ३६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार लगावत ४४ धावा केल्या. विजय शंकरने १३ चेंडूंत २३ धावा करताना दिल्लीला १६३ धावांपर्यंत मजल मारून दिली.
लक्ष्याचा पाठलाग करीत अॅलेक्स हेल्स आणि शिखर धवन या सलामीवीरांनी हैदराबादला आश्वासक सुरुवात करून दिली. दोघांनी ७६ धावांची सलामी दिली. ३१ चेंडूंत ३ षटकार व ३ चौकार लगावत ४५ धावा करणाऱ्या हेल्सला अमित मिश्राने त्रिफळाचीत केले. पाठोपाठ ३३ धावा करणाऱ्या धवनचाही मिश्राने त्रिफळा उडवला. कर्णधार केन विल्यम्सन आणि मनिष पांडे यांनी संयमी खेळ केला. लियाम प्लंकेटने ४६ धावांची ही भागिदारी पांडेला (२१) बाद करून संपुष्टात आणली. त्यानंतर विल्यम्सनला यूसूफ पठाणने साजेशी साथ देताना हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.