कानपूर । ‘करो या मरो’च्या लढतीत सनरायजर्स हैदराबादने गुजरात लायन्सवर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवत प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले. कर्णधार डेव्हीड वॉर्नर नाबाद (69) आणि वी.शंकर नाबाद (63) यांच्या शानदार खेळीच्या बळावर गुजरातने विजयासाठी दिलेले 155 धावांचे लक्ष्य हैदराबादने 19 व्या षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. दोघांनी दुस-या विकेटसाठी नाबाद 133 धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी दमदार सुरुवातीनंतर गुजरातच्या 43 धावात दहा विकेट गेल्या. गुजरातने दमदार सुरुवात करून मोहम्मद सीराज आणि राशिद खानच्या जोडीने गुजरातला मोठी धावसंख्या उभारू
दमदार सुरुवातीनंतर डाव कोसळला
प्रथम फलंदाजी करताना गुजरात लायन्सचा डाव 154 धावांवर आटोपला. इशान किशन (61) आणि स्मिथने (54) भक्कम सलामी दिली. अवघ्या दहा षटकात दोघांनी 111 धावा चोपून काढल्या. पण ही जोडी फुटल्यानंतर गुजरातचा डाव पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. अकराव्या षटकात स्मिथ बाद झाला. स्मिथने 54 धावा केल्या. स्मिथपाठोपाठ मैदानावर स्थिरावलेला किशनही (61) सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. सलामी जोडी तंबूत परतताच गुजरातची फलंदाजी ढेपाळली. सिराज आणि रशीदने एकेक फलंदाज तंबूत पाठवले. कर्णधार सुरेश रैना, कार्तिक, फिंच, फॉकनर या धडाकेबाज फलंदाजांना त्यांनी मैदानावर अधिक वेळ तग धरू दिला नाही. बिनबाद 111 धावा फलकावर असलेल्या गुजरातचा निम्मा संघ फक्त 12 धावांच्या अंतराने म्हणजेच 123 धावा असताना तंबूत परतला. सिराज आणि रशीदने दिलेल्या धक्क्यांनी गुजरातचा डाव अखेरपर्यंत सावरलाच नाही. सिराजने 4, राशिदने 3 तर भुवनेश्वरने 2 गडी बाद केले. रविंद्र जडेजाने नाबाद 20 धावांची खेळी केल्याने संघाला 150 धावांचा टप्पा पार करता आला.
धक्क्यातून सावरत मिळवला विजय
प्लेऑफ मधील स्थान निश्चित करण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला सुरुवातीलाच दोन झटके बसल्याने संघ अडचणीत आला होता. सलामीवीर शिखर धवन (18) आणि हेनरीक्स (4) स्वस्तात बाद झाले होते. मात्र डेव्हीड वॉर्नर आणि शंकरने अधिकची पडझड न होऊ देता हैदराबादला विजय मिळवून दिला. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि व्ही. शंकरच्या जिगरबाज नाबाद अर्धशतकी खेळीमुळे हैदराबादने गुजरातवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. गुजरातने 20 षटकांत ठेवलेले 155 धावांचे आव्हान हैदराबादने 19 व्या षटकांतच पार केले. या विजयासह हैदराबादने स्पर्धेच्या बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. बाद फेरीतील प्रवेशावर मोहोर उमटवण्यासाठी हैदराबादला गुजरातविरुद्ध विजय आवश्यक होता.