हैदराबाद बाँबस्फोट प्रकरण; एनआयएच्या विशेष न्यायालयाचा निकाल

0

नवी दिल्ली : हैदराबादमधील दिलसुखनगर भागात 2013 मध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी यासीन भटकळ आणि असादुल्ला अख्तर, एझाज शेख, तहसीन अख्तर आणि झिया उर रहमान उर्फ वकास या पाच दहशतवाद्यांना आज एनआयएच्या विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. यासीन भटकळ हा ‘इंडियन मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेचा सहसंस्थापक आहे. 13 डिसेंबर रोजी न्यायालयाने या पाचही जणांना दोषी ठरविले होते. आज त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. यातील एझाज शेख हा महाराष्ट्राचा आहे. तर झिया उर रहमान हा पाकिस्तानचा आहे. दिलसुखनगरमध्ये 21 फेब्रुवारी 2013 रोजी दोन स्फोट झाले होते. यामध्ये 18 जण ठार तर 131 जण जखमी झाले होते. या प्रकरणी उपरोक्त पाच जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली होती. तर रियाज भटकळ फरार असून तो पाकिस्तानमध्ये असल्याचे मानले जात आहे.

गेल्या वर्षापासून सुरू होता खटला
गेल्या वर्षी 24 ऑगस्टला राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या न्यायालयात भटकळ आणि त्याच्या साथीदारांविरोधात सुनावणी सुरु झाली होती. एनआयएच्या आरोपपत्रात हैदराबादमधील या स्फोटाचा कट इंडियन मुजाहिद्दीनने रचल्याचे म्हटले होते. रियाझ भटकळ यात प्रमुख आरोपी होता व त्याने असादुल्ला अख्तर व वकास यांना मंगलोर येथे स्फोटके लपवण्यासाठी जागा पाहण्यास सांगितले होते. रियाझने पाठवलेली स्फोटके अज्ञात व्यक्तीमार्फत मिळाली व हवालामार्गाने पैसेही मिळाले होते. नंतर अख्तर व वकास हे हैदराबादला गेले व तहसीन अख्तर ऊर्फ मोनू याच्याबरोबर काम सुरू केले. तो अब्दुल्लापूरमेट भागात राहात होता. नंतर तिघांनी मिळून दोन आयइडी व प्रेशर कुकर बॉम्ब व टायमरची जुळणी केली. 21 फेब्रुवारीला सायकल खरेदी करून त्यावर बॉम्ब लावून त्या दिलसुखनगर भागात ठेवल्या. एनआयएच्या चौकशीत असे निष्पन्न झाले, की आरोपींना परदेशातून मदत मिळाली होती. हैदराबाद येथे अब्दुल्लापूरमेट येथे त्यांनी चाचणी स्फोटही केला होता. हे आरोपी इंटरनेटने एकमेकांशी संपर्कात होते असे एनआयएने म्हटले होते. खटल्यात पुराव्यादाखल 440 साक्षीदार तपासण्यात आले. 251 कागदपत्रे व 300 स्फोटक पदार्थ त्यात पुराव्यासाठी सादर केले गेले होते.

हैदराबादेत झाले होते स्फोट
हैदराबाद शहरातील गजबजलेल्या दिलसुखनगरच्या बसस्टॉपजवळ तसेच कोणार्क थिएटरच्या समोर गुरुवार 21 फेब्रुवारी 2013 च्या सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन शक्तीशाली स्फोट झाले होते. दोन्ही स्फोटांमध्ये पाच मिनिटांचे अंतर होते. या स्फोटांमध्ये 18 जणांना प्राण गमवावे लागले होते, तर 131 जण जखमी झाले होते. दिल्लीला पकडण्यात आलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याने या जागांची गेल्या वर्षी पूर्वपाहणी केल्याची कबुली दिल्यामुळे संशयाची सुई इंडियन मुजाहिदीनकडे रोखली गेली होती. यानंतर यात पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती.

यासीन भटकळ हाच म्होरक्या
भटकळ बंधूंनी ‘इंडियन मुजाहिदीन’ ही दहशतवादी संस्था 2003 साली स्थापन केली होती. मोहम्मद अहमद सिद्दीबापा उर्फ यासिन उर्फ इम्रान उर्फ शाहरुख भटकळ हा इंजिनिअर असून नोकरीच्या निमित्ताने दुबईला जाऊन आला होता. प्रारंभी इंडियन मुजाहिद्दीनचा प्रमुख म्हणून इक्बाल भटकळकडे जबाबदारी सोपवण्यात आली. त्याच्या सोबत त्याचे भाऊ रियाझ व यासिन भटकळ, हफीफ, गोरा इस्माईल उर्फ व्हाईट अंकल आणि सुलतान याचा सहभाग होता. 2008 मध्ये बाटला हाऊस प्रकरणानंतर इक्बाल व रियाज देश सोडून फरारी झाल्यानंतर इंडियन मुजाहिद्दीनची सर्व जबाबदारी यासिनकडे आली.यानंतर त्याचा अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग आढळून आला. यात प्रामुख्याने अहमदाबाद, सुरत, बंगळूरू, पुणे, दिल्ली आणि हैदराबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये सहभाग असल्याचे दिसून आले होते.

दरम्यान, पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सोमवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आरोपपत्र दाखल केले. जैश- ए- महंमदचा म्होरक्या मसूद अजहरसह पाकिस्तानमधील अब्दुल असगर, शाहिद लतीफ आणि काशीफ जन या तीन दहशतवाद्यांवर यात आरोप ठेवण्यात आले आहेत. या वर्षाच्या सुरवातीलाच पाकिस्तानने पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला केला होता. तीन दिवस चाललेल्या चकमकीत सात लष्करी अधिकारी शहीद झाले होते, तर चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले होते. या हल्ल्यात जैशचा हात होता, हे या आरोपपत्रामुळे स्पष्ट झाले आहे.